अकोला दिव्य न्यूज : संपूर्ण विदर्भात लोकप्रिय तथा प्रतिष्ठित ठरलेल्या ‘विश्वास करंडक’ बाल नाट्य स्पर्धा अकोला नगरीत होत असून प्रमिलाताई ओक हॉलमध्ये ही स्पर्धा 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर अशी तीन दिवसांची राहणार आहे. या स्पर्धेत संपूर्ण वऱ्हाड प्रांतातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ येथील 30 शाळांमधील 30 बालनाट्यांचे सादरीकरण होईल. या 30 बालनाट्यांमध्ये 4 नाटके स्पर्धेचे आयोजक जे. आर.डी. टाटा स्कूल असून ही नाटके स्पर्धेच्या बक्षिसात सहभागी राहणार नाहीत. अशी माहिती महोत्सवाचे प्रमुख प्रा. मधु जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे व प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे यांनी आज आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धा दररोज सकाळी 9 वाजता पासून सुरू होणार असून प्रत्येक दिवशी सरासरी 8 ते 10 नाटकांचे सादरीकरण करण्यात येईल. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नाट्य क्षेत्रातील तज्ञ गिरीश फडके, धनंजय सरदेशपांडे व यतीन माझीरे काम बघतील. स्पर्धेचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता मागील वर्षाच्या स्पर्धेत पुरुष व महिला गटात उत्कृष्ट कलावंत म्हणून प्रथम पुरस्कार पटकाविलेल्या रुद्र जयदीप कुकडकर ईड्यू वीला पब्लिक स्कूल पातुर व अनया कुऱ्हे आर डी जी पब्लिक स्कूल अकोला यांचे हस्ते होईल.
स्पर्धेचा शुभारंभ मागील वर्षी विश्वास करंडक पटकाविणाऱ्या प्रभात किड्स स्कूलच्या नाटकाने करण्यात येईल. मागील 7 वर्षापासून सुरू झालेल्या या स्पर्धेत नियमित भाग घेणाऱ्या 80% शाळा आजही टिकून आहेत हे विशेष. बक्षीस वितरण समारंभ 13 डिसेंबर रोजी सायंकाळी मूळचे अकोला येथील विनय वैराळे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे परीक्षक तथा चित्रपट संकलक, चित्रपट विभाग भारत सरकार यांचे हस्ते होईल.
बक्षीस समारंभापूर्वी मागील वर्षीच्या स्त्री-पुरुष विजेत्यांसोबत विश्वास करंडकाची शहरातून फेरी काढण्यात येईल. या महोत्सवाचे तथा स्पर्धेचे प्रमुख प्रा. मधु जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, सहप्रमुख प्रदीप अवचार, अशोक ढेरे, निलेश गाडगे, अनिल कुलकर्णी, विष्णू निंबाळकर, प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, गीताबाली उनवणे, रितेश महल्ले, संदीप शेवलकर, अंकुश इंगळे आदी परिश्रम घेत आहेत.स्पर्धा विनामूल्य असून रसिकांनी ही बालनाट्ये अवश्य बघावीत व बाल कलावंतांचे कौतुक करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
