अकोला दिव्य न्यूज : Priyanshu Kshatriya Murder : नागपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘झुंड’ फेम अभिनेता प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीची निर्घृणपणे हत्या होण्याची धक्कादायक घटना घडली. पोलिंसाना प्रियांशू गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने नागपूर हादरलं आहे.

नागपूरमधील जरीपटका भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तिथे प्रियांशू त्यांना अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. तारेच्या साहाय्याने बांधून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्याच्या शरीरावर चाकूने मारल्याच्या खुणाही आढळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लालबहादुर साहू या संशयीताला अटक करण्यात आली आहे.
प्रियांशूने नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ सिनेमात बाबू नावाची छोटी भूमिका साकारली होती. या सिनेमामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. पण, नंतर त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटकही करण्यात आली होती. ५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा त्याच्यावर आरोप होता. इतर अनेक गुन्हेदेखील त्याच्यावर दाखल केलेले होते.
