Sunday, December 21, 2025
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील मुंडगावकर ज्वेलर्सचे अमोल मुंडगावकरला 6 महिने कारावास व दीड लाखाचा दंड

अकोल्यातील मुंडगावकर ज्वेलर्सचे अमोल मुंडगावकरला 6 महिने कारावास व दीड लाखाचा दंड

अकोला दिव्य न्यूज : अकोला येथील मुंडगावकर ज्वेलर्सचे संचालक अमोल विजयकुमार मुंडगांवकर यांना चेक बाऊंस प्रकरणात दोषी करार देऊन ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.तसेच फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून १ लक्ष ५० हजार रुपयांची रक्कम अदा करावी आणि दंडाची रक्कम न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावयाचा आहे. असा आदेश अकोला जिल्हा न्यायालयातील न्यायालय क्रमांक ८ चे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत एस. देशपांडे यांनी दिला आहे.

आरोपीला उपरोक्त शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठविण्याकरिता पकडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम ४१८ (२) अन्वये अजामिनपात्र वारंट काढण्यात आले आहे.

प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की अकोला शहरातील ‘न्यू मुंडगांवकर ज्वेलर्स’ यांच्याकडे जगन्नाथ वसंतराव महाजन यांनी रोख स्वरूपात रक्कम १ लक्ष रुपये २ फेब्रुवारी २०२१ रोजी जमा केले होते. त्याबदल्यात संचालक अमोल विजयकुमार मुंडगावकर (पिंजरकर) यांनी त्यांना त्यांच्या नावे ठेव पावती दिली होती. सदर रकमेवर रुपये १.५० दरमहा, दर शेकडा प्रमाणे व्याज देण्याचे कबूल केले आणि तसे ठेव पावतीवर नमुद सुद्धा करुन दिले होते.

ठेवीदार महाजन यांना ज्यावेळी रकमेची गरज असेल त्यावेळी आणि मागणी केल्यावर सदर रक्कम परत करण्यात येईल असे देखील ठेव पावतीवर नमूद केले आहे. सदर ठेवीच्या रक्कमेच्या कायदेशीर परतफेडीकरिता अकोला जनता बँकेच्या ताजनापेठ शाखेचा रुपये १ लाख रूपयांचा धनादेश क्रमांक ०००६८२ दिला होता. ठरल्याप्रमाणे महाजन यांना एक वेळी व्याजाची रक्कम दिली. त्याबाबतची नोंद ठेव पावतीच्या मागील बाजूस घेण्यात आली आहे. आरोपीने ठरल्याप्रमाणे व्याजाची रक्कम ३ महिन्यापर्यंत दिली होती त्यानंतर व्याजाची रक्कम आरोपीकडे थकीत होती.

या प्रकरणातील फिर्यादी महाजन व आरोपी मुंडगावकर यांच्यातील कराराप्रमाणे तसेच मुंडगावकरने सांगितल्यावरुन दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी सदर धनादेश वटविण्यासाठी बॅकेत लावला असता मुंडगावकरने त्याच बँक खाते बंद केल्या कारणाने धनादेश न वटता परत आला.तेव्हा महाजन यांनी नोंदणीकृत डाकेद्वारे मुंडगावकरला वकिलांमार्फत नोटीस पाठविली होती. आरोपीला १६ नोव्हेंबर २०२२ रोजी नोटीस प्राप्त झाली. नोटीस प्राप्त होऊनही आरोपीने नोटीसची पूर्तता केली नाही. त्यामुळे महाजन यांनी प्रकरण न्यायालयात दाखल केले.

आरोपीने गुन्हा नाकबूल करुन प्रकरण पुढे चालविण्याची विनंती केली.सदर प्रकरणात आरोपी हा सतत गैरहजर असल्यामुळे त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचा आदेश पारित करण्यात आलेला आहे. आरोपी हा फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (यापुढे थोडक्यात ‘फौ.प्र.सं.’) चे कलम ३१३ चा जबाब नोंदविण्यास टाळाटाळ व विलंब करीत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या Prakash Chimanlal Sheth Vs. T Ramalingam Nadar @ Ramalingam Thirivium Nadar and others, Cri. Application No.490/2020 Decided on 14.09.2022 व Navneet Gogia Vs. The State of Maharashtra, 2025 BHC AS 3054 या न्यायनिवाड्यांच्या आधारे आरोपीचा कलम ३१३ अन्वयेचा जबाब नोंदविण्यात आला नाही. फिर्यादीने पुरसिस निशाणी ४० प्रमाणे पुरावा बंद केला.

फिर्यादीच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. मात्र आरोपी मुंडगावकर अथवा आरोपीच्यावतीने कोणीही युक्तिवाद करण्यास हजर झाले नाहीत. प्रकरण आरोपीच्या युक्तीवादाशिवाय पुढे चालविण्यात आले. कागदपत्रांचे अवलोकन करून फिर्यादीचा युक्तिवाद व अभिलेखावर आलेल्या पुराव्यावरुन आरोपी अमोल मुंडगांवकर फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २५५ (२) नुसार परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अन्वये शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्याकरिता दोषी असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!