अकोला दि. 1/1/2024 : अकोला जिल्ह्यात महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोरोनाचा एक रुग्ण दि. 7 डिसेंबर रोजी आरटीपीआर चाचणीमध्ये बाधीत आला. त्याचे जिनोम सिक्वीसींगचे चाचणीमध्ये कोरोनाच्या जेएन 1 ह्या नवीन उपप्रकारामध्ये बाधीत असल्याचे दि. 24 डिसेंबर रोजी आढळून आला असून सदर रुग्ण सुस्थितीत असून बरा झाला आहे. कोरोनाचा जेएन 1 हा नविन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे.
जेएन 1 या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था यांनी सतर्क राहून अलर्ट मोडवर काम करीत आहेत. जिल्ह्यात दि. 27 ते 31 डिसेंबर पर्यंत 27 आरटीपीसीआर चाचण्या व 1149 रॅपीड असे एकूण 1176 कोविड चाचण्या करण्यात आल्यात. जिल्ह्यात केवळ तीन रुग्ण बाधीत असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात तीन सक्रीय रुग्ण असून जिल्ह्यातील एक रुग्ण (वय 40 वर्ष लिंग स्त्री) हा जिल्हा अमरावती येथे बाधीत असल्याचे आढळून आला असून तो अकोला महानगरपालिका भागातील असून उर्वरित दोन रुग्ण (वय 28 वर्ष व वय 42 वर्ष दोघेही पुरूष) हे पंचगव्हाण ता. तेल्हारा येथील रहिवासी आहेत.
या तिनही रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने ते गृहविलगीकरणामध्ये आहेत. आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर नियंत्रण ठेऊन आहेत. जिल्ह्यात प्राध्यान्याने श्वसन आजार, जोखमी व्यक्ती याची वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करण्यात येत आहे. तसेच दि. 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण प्रगतीपर 614 रॅपीड चाचण्या करण्यात येऊन त्यामध्ये दोन रूग्ण बाधीत असल्याचे आढळून आले.
तर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 535 रॅपीड चाचण्या करण्यात येऊन त्यामध्ये एकही रुग्ण बाधीत आढळून आला नाही. तर महानगरपालिका कार्यक्षेत्र व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे एकूण 27 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येऊन त्यामध्ये एक रुग्ण (वय वर्ष 38 स्त्री) बाधीत आढळून आला आहे. हा रुग्ण ता. मोर्शी जि. अमरावती येथील आहे. सदरची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
नविन वर्षाचे आगमन होणार असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे व काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या व्यक्तींनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यासारखी लक्षणे असल्यास त्वरीत नजिकच्या आरोग्य संस्थेत तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.