अकोला दिव्य न्युज ब्युरो : २१ व्या शतकातील युवापिढीला निरामय व सुदृढ शरीरासह जीवन जगण्याची ‘प्रेरणा’ देणारे, अकोला शहराचे ‘ चिरतरुण ‘ नारायणदास हिरालाल खंडेलवाल यांचे आज रविवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी ३.३० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने नागपूर येथे जीवनाच्या ९८ वर्षे २ महिने वयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी पुष्पलता तसेच तीन मुले अरविंद, रवि, मनोज व मुलगी सीमा आणि भाऊ मोहनलाल व वसंतकुमार खंडेलवाल आणि नातनातवंडासह मोठे आप्तकुटुंब व मित्रपरिवार आहे.
आपल्या निरोगी जगण्याचं आणि जीवनाचं ‘शतक’ नारायणदास खंडेलवाल सहज करणारं असा सर्वांना विश्वास होता. पण काही दिवसांपूर्वी त्यांना ‘युरीन इन्फेक्शन’ झाले आणि नागपूर येथे यावर उपचार सुरू असताना, त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. नागपूर येथून आज रविवारी त्यांचे मृतदेह अकोल्यासाठी रवाना होणार आणि सायंकाळच्या सुमारास त्यांचा राहत्या निवासस्थानी पार्थिवदेह अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. विदर्भातील प्रख्यात कापूस व्यावसायीक हिरालाल खंडेलवाल यांच्या कुटुंबात २६ ऑक्टोबर १९२६ रोजी नारायणदास खंडेलवाल यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणानंतर संयुक्त कुटुंबाच्या ‘पन्नालाल हिरालाल’ प्रतिष्ठानातील कापसाच्या व्यवसायात सहभागी होऊन त्यांनी जीवनाला सुरुवात केली.
वयाच्या १९ व्या वर्षात नारायणदास यांचा १ जानेवारी १९४५ रोजी पुप्षलता यांच्यासोबत विवाह झाला. तरुण वयापासूनच नियमित व्यायाम, संतुलित शाकाहार, दररोज सकाळी ६ किलो मीटर ‘वॉक’ हे त्यांनी जीवनाचे अविभाज्य भाग बनवले होते. सकारात्मक विचारसरणी आणि निरोगी जीवन पध्दतीचा अवलंब हा ‘चिरतरुण’ राहण्याचे मुलमंत्र असल्याचे ते सांगत असे. नारायणदास खंडेलवाल यांच्या ‘फिटनेस’बद्दल सर्वांना अप्रुप वाटत होते. मुंबई येथे वर्ष २०१४ मध्ये झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत वयाच्या ८९ वर्षात सहभागी होऊन त्यांनी आपली शारीरिक क्षमता कायम असल्याचे दाखवून दिले होते. याबद्दल त्यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
कापूस व्यवसायातून कापसातील ‘स्टेपल’ ओळखण्यात ते तज्ज्ञ होते. कापूस व्यवसाय क्षेत्रासोबत शेवटपर्यंत जुडलेले खंडेलवाल यांना वर्ष २००२ मध्ये इंडियन प्रीमियर कॉटन ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, मुंबईकडून ‘लाईफ टाईम अचीव्हमेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या जीवन ‘शतक’ संबंधाने शानदार सोहळा आयोजित करण्याचें नियोजन केले जात होते.अशात
इंग्रजी नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला नारायणदास खंडेलवाल यांची ‘एक्झीट’ मनाला चटका लावून गेली असली तरी निरोगी ‘चिरतरुण’ म्हणून ते सदैव लक्षात राहणार आहेत.