अकोल्याच्या कन्येची गरुडझेप: ‘श्री दत्त मेडिकल’च्या संचालकांची कन्या कोमल सॉवल एम.डी. (चर्मरोग) उत्तीर्ण

    0
    5

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : मेहनत, जिद्द आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर अकोल्याची लेक कोमल जयप्रकाश सॉवल हिने वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत मानाची समजली जाणारी एम.डी. (चर्मरोग – Dermatology) ही पदव्युत्तर परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केली आहे. तिच्या या दैदीप्यमान यशामुळे अकोला शहराच्या आणि वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.


    अकोल्यातच घडला शिक्षणाचा पाया
    कोमल ही लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि अभ्यासात चुणचुणीत विद्यार्थीनी म्हणून ओळखली जाते. तिचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अकोला शहरातच पूर्ण झाले. शालेय जीवनापासूनच तिने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली होती. त्यानंतर तिने अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (GMC) आपले एम.बी.बी.एस. (MBBS) चे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास अकोल्यातूनच पूर्ण करत तिने चर्मरोग या अत्यंत महत्त्वाच्या विषयात एम.डी. करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातही घवघवीत यश संपादन केले.
    वडिलांचे प्रोत्साहन आणि ‘श्री दत्त मेडिकल’चा वारसा
    कोमलचे वडील जयप्रकाश सॉवल यांचा अकोल्यात औषध विक्रीचा व्यवसाय आहे. अकोला शहर आणि संपूर्ण पंचक्रोशीत सॉवल कुटुंबियांचे ‘श्री दत्त मेडिकल’ हे औषधालय अत्यंत विश्वासार्ह आणि ख्यातनाम म्हणून ओळखले जाते. औषध व्यवसायाच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा जपणारे जयप्रकाश सॉवल यांनी कोमलला नेहमीच डॉक्टर होण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. वडिलांनी पाहिलेले स्वप्न कोमलने आपल्या कठोर परिश्रमाने सत्यात उतरवून दाखवले आहे.
    पुढील वाटचाल आणि अनुभव
    एम.डी.ची पदवी संपादन केल्यानंतर आता एक निष्णात त्वचाविकार तज्ज्ञ (Skin Specialist) म्हणून प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी, अधिकचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी कोमल एका नामांकित मोठ्या रुग्णालयात कार्यरत होणार आहे. आधुनिक उपचार पद्धतीचा अनुभव घेऊन भविष्यात अकोलेकरांच्या सेवेत रुजू होण्याचा तिचा मानस आहे. तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सॉवल परिवार, मित्रमंडळी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि अकोल्यातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    स्नेही मित्र जयप्रकाश सॉवल यांची सुकन्या कोमल जयप्रकाश सॉवल हिने मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल • राजू मालविया • अशोक शर्मा • सुनील साबळे • नामदेव भेंडे • साकेत पांडे यांनी मनःपुर्वक अभिनंदन केले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!