अकोला दिव्य न्यूज : संयमाचा बांध फुटेपर्यंत देशभक्तीचा डोस पाजून, व्यक्ती विशेषासाठीचा प्रोपोगंडा म्हणावे अशा पठडीतील ‘धुरंधर-२ : द रिवेंज’ हा चित्रपट पाहून आलेल्या अल्पवयीन नशेखोर मुलांच्या टोळीने घातलेल्या सशस्त्र धुडगूस घालत केलेल्या हल्ल्यात तीनजण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींची धरपकड सुरू करून २ अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेतले आहे.

अंगावर शहारे आणणारी ही थरारक घटना ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्या’ मध्ये टिपल्या गेली आहे. चित्रपटात दाखवलेल्या दृश्यानुसार त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न नव्या पिढीकडून केला जातो. यातूनच अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील घडतात. ‘सध्या चांगलाच चर्चेत असलेला आणि तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत असलेल्या धुरंधर : द रिवेंज’ हा चित्रपट बघून चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर दारूच्या नशेत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह तीनजणांनी हे कृत्य केले आहे.

कौलखेड भागातील श्रद्धानगर-३ मध्ये नशेखोर टोळीने धुमाकूळ घातला. या टोळीने तीन जणांना चाकू मारून जखमी केले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. या युवकांनी परिसरात चाकू आणि पाइपच्या बळावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.श्रद्धा नगर येथे अभिलाष अरविंद हिंगे (३२) यांच्यावर चाकू आणि लोखंडी पाइपने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खासगी रुग्णालयात हिंगेंवर उपचार सुरू आहेत. तसेच कौलखेड चौकात रवी उर्फ छोटू ठाकरे (२४) याच्यावरही त्याच टोळीने हल्ला करुन जखमी केले. या घटनेत अन्य एकजण जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे पसरले.
माहिती मिळताच खदान पोलीस आणि एलसीबीचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या घटनेत इतर कोणी सहभागी आहेत काय, याचाही पोलीस तपास करीत आहे.घटनेनंतर कौलखेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
