Friday, April 3, 2026
No menu items!
No menu items!
Homeहत्येचा कट ! बच्चू कडू यांच्यावर चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

हत्येचा कट ! बच्चू कडू यांच्यावर चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

अकोला दिव्य न्यूज : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी दिली. या गंभीर तक्रारीनंतर अमरावती ग्रामीण पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रवीण तायडे यांनी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव केला होता.

संग्रहित छायाचित्र

काय आहे नेमके प्रकरण?
अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे (वय ४०, रा. कोल्हा काकडा) हे मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यासाठी कार्यरत असतात. अभिजीत तायडे आणि प्रवीण तायडे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार आमदार प्रवीण तायडे यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी बच्चू कडू यांनी त्यांना (अभिजीत तायडे यांना) अपघाताचा बनाव करून संपवण्याचा कट रचला होता.

‘ऑडिओ क्लिप’चा पुरावा
तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, गेल्या डिसेंबर महिन्यात बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी एक बैठक झाली होती. या बैठकीत बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि इतर व्यक्ती अभिजीत तायडे यांना अपघातात ठार मारण्याबाबत चर्चा करत होते. एका गोपनीय साक्षीदाराने या संभाषणाचे रेकॉर्डिंग केले असून, त्या संभाषणाची क्लिप असलेला ‘पेन ड्राईव्ह’ तक्रारदाराने पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. आमदार प्रवीण तायडे हे विधिमंडळाच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने ही तक्रार देण्यास विलंब झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांची कारवाई
प्राप्त तक्रार आणि पेन ड्राईव्हमधील प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ५५, ५८ आणि ६१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेली ऑडिओ क्लिप आणि त्यातील संभाषणाची सत्यता पडताळण्यासाठी ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

पोलिसांचे शांततेचे आवाहन
या संवेदनशील प्रकरणानंतर परिसरात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करीत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!