Akola Divya Crime News : अकोल्यातील अकोट फैल भागात काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवक आणि दोन्ही पक्षाचा नगरसेवकांचे समर्थक यांच्यात काल रविवारी रात्रीला झालेल्या जोरदार राड्यात एकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. चाकू हल्ल्यात तो गंभीर जखमी असून अन्य चारजण देखील यात जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र पुन्हा एकदा अकोल्यात राजकीय वाद विकोपाला गेल्याचे बघायला मिळाले आहे.

अकोला महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच काँग्रेस आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचे नगरसेवक आणि समर्थक यांच्यातील तणाव सातत्याने वाढतचं आहे. काल (रविवार) रात्रीही अकोट फैल भागात एमआयएमचे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल करीम यांच्यातील शाब्दिक वादाचे रूपांतर अल्पावधीतच झटापटी, हाणामारी आणि दगडफेकीत झाले. या गोंधळादरम्यान, एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला झालाय. या घटनेत एकत्रित 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
एमआयएमचे नगरसेवक आणि काँग्रेसचे नगरसेवक तसेच त्यांचे समर्थकांमध्ये हा संपूर्ण राडा झाला होता. अंतर्गत राजकीय धुसफूस हेच या वादाचं प्रमुख कारण असल्याचे समजतं आहे. या घटनेनंतर, परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता.पोलिसांनी घटनास्थळी तातडीने जात परिस्थिती नियंत्रणात आणली कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.

यापूर्वी देखील असाच राजकीय वाद झाल्याचे पाहायला मिळालं होतं. यात महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला होता. महापालिकेच्या स्वच्छतेच्या कंत्राटावरून उडालेल्या गोंधळावर उत्तर कोणी द्यायचं, यावरून दोन्ही बाजूचे सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. प्रशासनाने उत्तर देण्याऐवजी भाजपचे नगरसेवक उत्तर देत असल्याच्या गोष्टीवर विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला. शहरातील स्वच्छतेसाठी पडीक वार्डांचे बजेट वाढविण्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.
