अकोला दिव्य न्यूज : संकट काळात आत्मविश्वास निर्माण करणारे ‘हनुमंत’ आणि प्रत्येक आक्रमणाला परतवून लावत हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे ‘शिवाजी’ या दोहोंच्या केवळ नाम स्मरणाने एक वेगळेच स्फुरण चढते. अर्थात आणि सर्व अर्थाने एकाच वाक्यात म्हणायचे तर ‘तुम रक्षक, काहू को डरना’ ! प्रत्येक धार्मिक आयोजनात आपलं आगळेपण जोपासणारे सालासर बालाजी मंदिराच्या विश्वस्तांनी यंदा महाबलशाली व ज्ञानवंत हनुमान यांच्या जन्मदिनी, महापराक्रमी व प्रजा प्रतिपालक ‘शिवाजी’ महाराज यांच्या ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेचा चलित देखावा सादर करून दुग्ध शर्करा योग घडवून आणला आहे.

अकोला शहरातील गंगानगर बायपास परिसरातील सालासर बालाजी मंदिरात अनेक वर्षापासून अनेक धार्मिक विधी पुजा अर्चा सोबतच अद्भूत व नयनरम्य देखावे सादर केले जातात.या परंपरेला साजेसा ३ दिवसीय हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो आहे यावर्षी 2 ते 4 एप्रिलपर्यंत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सवात प्रथमच मंदिर परिसरात इतिहासातील शोर्य व स्वाभिमानाची परंपरा निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवकालीन ‘हिंदवी स्वराज्य’ चार देखावा साकारण्यात येत आहे. हा चलित देखावा निश्चितच भाविकांचे लक्ष वेधणार.
महोत्सव काळात मंदिराच्या गर्भगृहात चलित देखावा सजीव झांकी रुपाने भक्तांसाठी सादर करण्यात येत आहे.जन्मोत्सवच्या पूर्व संध्येला 1 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता ख्यातीप्राप्त सालासर सत्संग मंडळाच्या वतीने सामूहिक सुंदरकांड पठणाचा कार्यक्रम होत आहे. हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा दि. 2 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पावन दिनी सकाळी पुरोहित व मान्यवर यजमानांच्या हस्ते हनुमंतांच जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी 7 वाजता हनुमान स्त्रोत व सामुहिक आरती करण्यात येणार आहे.

प्रस्तुत शिवकालीन देखावा दि 4 एप्रिलपर्यंत दररोज दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तीन दिवसीय महोत्सवात भाविक भक्तांसाठी विशेष व्यवस्था उपलब्ध केली असून परिसरात सेल्फी पॉईंट निर्माण करण्यात आले आहेत बालकांसाठी उद्यान व खेळण्यासाठी अनेक स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहे. मंदिरात नयनरम्य रोषणाई व फुलांची आरास करण्यात येत आहे. दर्शनाची उत्तम व्यवस्था राहणार असून पूजा सामग्री व बच्चे कंपनीच्या करमणुकीचे स्टाल देखील राहणार आहेत.
सालासार बालाजी मंदिरातील वार्षिक चार मोठ्या महोत्सवापैकी एक असणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन सालासार बालाजी सेवा समितीचे समस्त विश्वस्त व सेवाधारी यांनी केले आहे.
