Friday, March 27, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्याचे दंत चिकित्सक दिवाकर आचार्य यांच्या 'पीळ'ला राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार

अकोल्याचे दंत चिकित्सक दिवाकर आचार्य यांच्या ‘पीळ’ला राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार

अकोला दिव्य न्यूज : अकोल्यातील दंत शल्य चिकित्सक दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या ‘पीळ’ कादंबरीला उत्कृष्ट कादंबरीचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र व इतरही राज्यातील साहित्यिक व प्रकाशकांकडून 252 ग्रंथ प्राप्त झाले होते. या सर्वांमधून ‘पीळ’ कादंबरीची निवड करण्यात आली.
महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान प्रसिद्ध आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2026 च्या राज्यस्तरीय ‘मारोतराव नारायणे स्मृती’पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली असून त्यात उत्कृष्ट कादंबरी चा पुरस्कार डॉ. दिवाकर आचार्य यांनी लिहिलेल्या ‘पीळ’ कादंबरीस जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कार निवड समितीचे परीक्षक म्हणून नाशिकचे प्रयोगशील कादंबरीकार राकेश वानखडे, नागपूरच्या शांती विद्या भवनचे प्राचार्य व समीक्षक डॉ. प्रकाश राठोड व पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य डॉ.संदीप भेले, किशोर पेटकर व सूर्यकांत पाटील यांनी काम पाहिले. मारोतरावं नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 25 एप्रिल 2026 रोजी वर्धा येथील एका समारंभात डॉ. आचार्य यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
कादंबरीचे लेखक आचार्य हे दंतशल्य चिकित्सक असून अकोला येथे कार्यरत आहेत. अकोल्यातील दंत महाविद्यालयात ते 24 वर्षे प्राध्यापक होते. अखेरच्या 10 वर्षात त्यांनी सहाय्यक अधिष्ठाता पद भूषविले. व्यवसायाने डॉक्टर असले तरी साहित्य व लेखन क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा, कादंबऱ्या व विविध लेखांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या ‘माइल्स टू गो’ या कथा संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे.
डॉ. दिवाकर आचार्य यांना या ‘पीळ’ कादंबरीची कल्पना सर्वप्रथम 1980 च्या दरम्यान सुचली. व त्यानंतर या विषयाचा अभ्यास व संशोधन करून पाच वर्षांपूर्वी त्यांनी या कादंबरीचे लिखाण सुरू केले होते. पशुवैद्य आणि त्यांचा पशुंसोबत असलेला भावनिक बंध हा विषय मराठी साहित्य क्षेत्राला अपरिचित आहे. या कादंबरीमध्ये दोन समांतर विश्व आहेत. एक स्वतःचे स्वतंत्र स्वभाव असलेल्या माणसाचे आणि दुसरे म्हणजे तेवढेच स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेल्या जनावराचे. पशुवैद्य असलेला अर्जुन या कथानकाचा नायक तर अडलेली म्हैस ‘लक्ष्मी’ या कथानकाची नायिका.

भूमी,स्त्री व म्हैस या तिन्ही सृजन तत्त्वांची वेदना एकच असते.हे अधोरेखित करणारी ही कादंबरी शोषण,भय,अपमान,दुःख, वेदना, अहंकार यांचे वेगवेगळे पीळ उलगडत जाते. त्यात सोबत पश्चिम वऱ्हाडांमधील ग्रामीण कृषीवल जीवन आणि लोकभाषा यांचे अस्सल आणि वास्तववादी जीवन या ‘पीळ’ कादंबरीतून बघावयास मिळते. डॉ. दिवाकर आचार्य यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अकोल्याच्या साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!