अकोला दिव्य न्यूज : रामायण ही केवळ कथा किंवा इतिहास नाही, तर ती मनुष्याला माणूस बनवणारी एक दिशा आहे. प्रभू श्रीराम अयोध्येत सगुण रूपात जन्मले असले, तरी महाराष्ट्रातील संतांनी त्यांना ‘नामरूपाने’ आपल्या प्रत्येकाच्या हृदयात अजरामर केले आहे,असे प्रतिपादन प्रसिद्ध अभ्यासक रामकथाकार डॉ. भूषण फडके यांनी केले.निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने जठारपेठ येथील बिर्ला मंदिर येथे पाच दिवसीय ‘संगीत श्रीरामकथा’ महोत्सवाचा बालकांडाच्या निरूपणाने आरंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ.फडके यांनी वाल्मीकी रामायणातील प्रसंगांची सांगड वारकरी संप्रदायातील संतांच्या शिकवणीशी घालत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

आज श्रीरामजन्म, त्राटिका वध, अहिल्या उद्धार, सीता स्वयंवर या घटनांची गुंफण डॉ. फडकेंनी रंजक आणि अभ्यासपूर्ण निरुपणातून केली. तुकोबांची नामभक्ती आणि ज्ञानेश्वरांचा संयम, रामजन्माचा आनंद आणि पंढरीच्या वाळवंटातील भक्तीचा खेळ हा एकच आहे,असे सांगत डॉ.फडके यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ‘राम कृष्ण हरी’ मंत्राचा महिमा विशद केला. तसेच, दशरथाला मिळालेला ‘पुत्रवियोगाचा शाप’ कुलगुरू वसिष्ठ ऋषींनी जसा सकारात्मकतेने स्वीकारला, तसेच संत ज्ञानेश्वर माऊलींनी जगाच्या निंदेचा राग न धरता ‘पसायदान’ मागून विश्वाच्या कल्याणाचा मार्ग दाखवला, असेही त्यांनी नमूद केले.
संत एकनाथ महाराज आणि भावार्थ रामायण निरूपणादरम्यान डॉ. फडके यांनी संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “नाथांनी ‘भावार्थ रामायणातून’ रामाचा खरा भाव जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. विश्वामित्रांनी रामाला दिलेली ‘बला’ आणि ‘अतिबला’ ही विद्या म्हणजे केवळ मंत्र नसून ते रामाच्या आत्मबळाचे जागरण होते, असे नाथांनी स्पष्ट केले आहे. शारीरिक सामर्थ्याला जेव्हा आत्मबळाची जोड मिळते, तेव्हाच राष्ट्ररक्षणाचे ध्येय साध्य होते, हा एकनाथ महाराजांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रस्तुत आहे.
अहिल्या उद्धार आणि नामदेवांची ओढ अहल्या उद्धाराच्या प्रसंगावर बोलताना डॉ. फडके म्हणाले की, अहल्या शिळा झाली होती याचा अर्थ ती भावशून्य झाली होती. संत नामदेव महाराजांच्या मते, जेव्हा मानवी मन संसाराच्या तापाने पाषाणासारखे कठोर होते, तेव्हा केवळ ‘रामनामाचा’ स्पर्शच त्याला पुन्हा सजीव करू शकतो. रामाने समाजाने बहिष्कृत केलेल्यांना पुन्हा सन्मानाने प्रवाहात आणले, हाच खरा समतेचा विचार आहे.
प्रसंगानुरूप गीतांनी वातावरण भक्तिमय झाले. तुझ मागतो मी आता, राम का गुणगान करिये, खेळ मांडीयेला वाळवंटी घाई हि गीते वैशाली फडके यांनी, तर कुश लव रामायण गाती, दशरथा घे हे पसायदान, आजी सोनियाचा दिनू, हि गीते प्रा.निखील देशमुख यांनी तर देवाशिष फडके याने जेष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, चला राघव चला, स्वयंवर झाले सीतेचे हि गीते सदर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली, हर्मोनियमची साथ देवशिष फडके, तबल्याची साथ हार्दिक दुबे, मृदंग विघ्नेश बोकसे, टाळ सुमंत तर्हाळकर यांनी केली.

मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रामभक्तांनी “सियावर रामचंद्र की जय” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला होता. कार्यक्रमाला भाविकांची उपस्थिती होती. दिलीप देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि कलावंतांचा करून दिला. नगरसेवक निलेश देव, श्री.गजानन पुसेगावकर ,जयंतराव सरदेशपांडे, अजय शास्त्री ,संजय देशमुख,यांच्या हस्ते आरती करण्यात आली. निलेश देव मित्र मंडळाच्या आयोजनाने रसिक भक्तिरसात न्हाऊन निघालेत. कार्यक्रमाला भाविकांची प्रचंड उपस्थिती होती.
