Thursday, March 12, 2026
No menu items!
No menu items!
Homeमराठा सेवा संघाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी गजानन हरणे

मराठा सेवा संघाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी गजानन हरणे

अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले ज्येष्ठ समाजसेवक गजानन ओंकार हरणे यांची अ.भा.मराठा सेवा संघाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अ.भा. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वामनराव भिलारे राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर यांनी ही निवड जाहीर करत मराठा योद्धा गजानन हरणे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे अकोला जिल्ह्यातील मराठा समाजामध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकोला येथील जिल्हा परिषद नगर, खडकी परिसरातील रहिवासी असलेले गजानन हरणे हे गेल्या 35 वर्षांपासून विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय राहून समाजहितासाठी कार्य करत आहेत. विशेषतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ दिवस आमरण उपोषण करून आपली ठाम भूमिका मांडली होती. मराठा समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी सातत्याने सहभाग नोंदवून समाजातील प्रश्नांना आवाज देण्याचे काम केले आहे. तसेच त्यांना 100 च्या वर पुरस्कारासह मराठा समाज भूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.

मराठा आरक्षण चळवळीचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी खंबीर पाठिंबा देत विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. मराठा, देशमुख, पाटील व कुणबी समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. अ.भा.मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना गजानन हरणे यांना अकोला जिल्ह्यातील सर्व तालुके, शहर आणि महानगर पातळीवर संघटनेच्या शाखा स्थापन करण्याचे तसेच मराठा-देशमुख-पाटील-कुणबी समाजाला संघटित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून संघटनात्मक बळकटी निर्माण करण्यासाठी ते कार्यरत राहतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.गजानन हरणे यांच्या निवडीचे अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!