Thursday, March 12, 2026
No menu items!
No menu items!
Homeआई-वडिलांची सेवा हीच खरी देवपूजा ! सेवाभावी 'पंकज'चा गौरव

आई-वडिलांची सेवा हीच खरी देवपूजा ! सेवाभावी ‘पंकज’चा गौरव

आगाखान पठाण यांजकडून
अकोला दिव्य न्यूज : आई-वडिलांच्या सेवेसोबतच समाजकार्यात सातत्याने योगदान देणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले अकोला कृषी विभागाचे ग्रामपंचायत अधिकारी पंकज जगताप यांचा वाढदिवस अकोला जिल्हा कलावंत संघाच्या वतीने अशोक वाटिका येथे उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश मोरे होते. यावेळी महाराष्ट्र शासन कलावंत समितीचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठलराव महाराज खापरकर, ह.भ.प. श्रीधर महाराज आणि ह.भ.प. गुरुदास गावंडे महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन पंकज जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यातील विविध कलावंतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी मान्यवरांनी सांगितले की, पंकज जगताप हे सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. पालकांची सेवा, समाजकार्य आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. ‘आई-वडिलांची सेवा हीच खरी देवपूजा आहे,’ या भावनेतून त्यांनी आयुष्य जगत समाजात एक सकारात्मक संदेश दिला असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अमोल कलोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी अकोला पंचायत समितीचे संजय गवळी, समाजसेवक मनोहर बनसोड, विस्तार अधिकारी उल्हास मोकळकर तसेच महाराष्ट्राचे प्रसिद्ध कव्वाल गायक लुकमान शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद बनसोड आणि जिल्ह्यातील कलावंत मंडळींनी केले होते.

पंकज जगताप आपल्या वृद्ध आई-वडिलांची अत्यंत आदराने व प्रेमाने सेवा करीत होते. त्यांचे वडील शालिग्राम जगताप (वय ९०) आणि आई लिलाबाई जगताप (वय ८०) शिवणी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या सेवेसाठी पंकज आणि त्यांच्या पत्नी संजीवनी सातत्याने प्रयत्नशील होते.आज दोन्ही हयात नाहीत. मात्र पंकज व त्यांच्या पत्नीने त्यांची केलेली सेवा आजही परिसरात चर्चेचा विषय आहे. सुरूवातीला आई लिलाबाई त्यानंतर यांच्या वडिलांचे निधन झाले. मात्र त्यानंतरही आई वडीलांच्या आशिर्वादाने जगताप यांनी समाजसेवेचा वसा सुरूच ठेवला आहे. सध्या त्यांच्या कुटुंबात भाऊ मुकुंद जगताप, बहिण अंतकला गवई, जीवनकला रूपनारायण, सुवर्णकला बागडे आणि रत्नकला सदार असा मोठा परिवार आहे.

पालकभक्ती, समाजसेवा आणि साधेपणातून सकारात्मक मूल्ये जपणारे पंकज जगताप यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!