Sunday, March 8, 2026
No menu items!
No menu items!
Homeमहिलांच्या 'कला-कौशल्य'ला 'सन्मित्र'मध्ये मिळाला मंच ! विविध स्पर्धा

महिलांच्या ‘कला-कौशल्य’ला ‘सन्मित्र’मध्ये मिळाला मंच ! विविध स्पर्धा

अकोला दिव्य न्यूज : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला पालकांसाठी विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रम गोदावरी बहुउद्देशीय संस्थांद्वारे संचालित अकोला बिर्ला रोड येथील सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून महिलांना थोडासा विरंगुळा मिळावा, त्यांना स्वतःसाठी वेळ देता यावा तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कला, कौशल्य आणि आत्मविश्वासाला योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांचे विद्यार्थ्यांनी पुष्पवर्षाव करून तसेच स्वतः तयार केलेली शुभेच्छापत्रे देऊन मनःपूर्वक स्वागत केले. प्रमुख अतिथी श्रीमती गोदावरी राजपूत यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने विशेष रंगत आली. इयत्ता चौथीची विद्यार्थिनी नेहा देवकर हिने आईच्या ममतेचे भावस्पर्शी चित्रण करणारी कविता सादर केली. तर रिशिका जाधव व गार्गी माहुलकर यांनी स्त्री शक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रभावी विचार मांडले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यविष्काराने उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला.

महिला पालकांसाठी कविता सादरीकरण, गायन, भाषण अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमध्ये महिला पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रमात रंग भरला. सौ. भागवत व सौ. बैस यांनी आई-मुलीच्या प्रेमळ नात्याचे नृत्यातून सादरीकरण केले. तसेच सौ किल्लेदार, सौ. जाधव, सौ.विश्वेकर व सौ. चंद्रा यांनी सामूहिक नृत्य सादर करून ‘बाईपण भारी देवा’ या भावनेची जाणीव सर्वांना करून दिली.

महिला पालकांसाठी आयोजित रांगोळी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. रंगीबेरंगी आणि कलात्मक रांगोळ्यांनी परिसर खुलून गेला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. शित्रे यांनी पटकावला. प्रमुख अतिथी श्रीमती गोदावरी राजपूत यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषेचेही आयोजन करण्यात आले होते. मीनल भाले यांनी प्रश्न विचारून महिलांच्या ज्ञानाची चुणूक पाहिली व योग्य उत्तरे देणाऱ्या महिलांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन प्राजक्ता उपशाम यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मीनल बोर्डे व इयत्ता ४चा विद्यार्थी स्वराज हरणे यांनी तर आभार प्रदर्शन भार्गवी पाटील हिने केले.

संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंग राजपूत व मुख्याध्यापिका मनीषा राजपूत यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे महिला पालकांना आनंददायी अनुभव मिळाला तसेच त्यांच्या आत्मविश्वासाला नवी ऊर्जा मिळाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!