अकोला दिव्य न्यूज : अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सनदी लेखापाल अभ्यासक्रमातील अंतिम परिक्षेचा निकाल दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालात कृष्णा सुनील गोयनक यांनी ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून, गोयनका परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. लहानपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धी असलेल्या कृष्णाने इयत्ता १० शिकत असताना, सीए होण्याचा निर्धार केला होता आणि नियमित अभ्यासाची सवय ठेवून त्यांने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले.

अकोला जिल्ह्यातील व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात गोयनका एक यशस्वी कुटुंब असून सामाजिक, आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात तनमनधनाने योगदान देणारे सुनील गोयनका यांचा कृष्णा गोयनका मुलगा आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यावसायीक व ग्रेन मर्चंट असोसिएशन आणि आडतीया मंडळाचे माजी अध्यक्ष आणि विविध धार्मिक संस्था व संघटनेत सक्रिय ओमप्रकाश गोयनका हे कृष्णाचे मोठे वडिल आहेत. पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल ग्रेन मर्चंट असोसिएशन व आडतीया मंडळातर्फे कृष्णाचा सत्कार करण्यात आला. भावी काळातील उज्वल,यशस्वी वाटचालीसाठी त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
