अकोला दिव्य न्यूज : Holika Dahan Shubh Muhurt : यंदाची होळी ही धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत गुंतागुंतीची मानली जात आहे. एका बाजूला भद्रा काळाचे सावट आणि दुसऱ्या बाजूला 3 मार्चला होणारे चंद्रग्रहण, यामुळे होलिका दहनासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता, असा प्रश्न भाविकांना पडला आहे. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत सूक्ष्म गणनेनुसार उद्या मंगळवार 3 मार्चच्या ग्रहणापूर्वी आणि आज सोमवार २ मार्चला भद्रेनंतर एक असा काळ येत आहे, जिथे केवळ 12 मिनिटांचा ‘अति शुभ’ मुहूर्त मिळत आहे.नेमका मुहूर्त आणि वेळ काय?

आज 2 मार्च 2026 रोजी फाल्गुन पौर्णिमा तिथी आहे. मात्र, उद्या मंगळवारी दिवसभर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत भद्रा काळ असल्याने शास्त्राने होळी पेटवण्यास मनाई केली आहे. आज सोमवारी रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी भद्रा संपत आहे. रात्री 11 वाजून 14 मिनिटे ते 11 वाजून 26 मिनिटे या दरम्यानचा काळ ‘होलिका दहनासाठी’ सर्वोत्तम मानला जात आहे. हा 12 मिनिटांचा काळ महत्त्वाचा असण्याचे कारण असे की, यादरम्यान भद्रा पूर्णपणे संपलेली असेल आणि उद्या मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून लागणाऱ्या चंद्रग्रहणाचे वेध अद्याप सुरू झालेले नसतील. त्यामुळे दोषमुक्त पूजेसाठी हा छोटासा कालावधी सुवर्णसंधी ठरेल.
मुहूर्ताचे शास्त्रीय महत्त्व
होलिका दहन करण्यासाठी हिंदू धर्मशास्त्रात ‘भद्रा मुख’ वर्ज्य मानले जाते. जर भद्रा काळात होळी पेटवली, तर त्या भागात रोगराई, आर्थिक हानी आणि कौटुंबिक कलह वाढण्याची भीती असते, असे ‘मुहूर्त चिंतामणी’ या ग्रंथात म्हटले आहे. आज रात्री 11 वाजेपर्यंत भद्रा पृथ्वीलोकात वास्तव्यास आहे. भद्रा ही शनी देवाची बहीण असून ती अत्यंत क्रूर मानली जाते. म्हणून शुभ कार्यासाठी तिची वेळ टाळली जाते. उद्या मंगळवारी 3 मार्च रोजी दुपारी 3:20 वाजता खग्रास चंद्रग्रहण आहे. त्याचे वेध उद्या सकाळी सूर्योदयापासूनच सुरू होणार आहेत. सूतक काळात अग्नी प्रज्वलन करणे किंवा पूजा करणे निषिद्ध असते. म्हणूनच, आज मध्यरात्रीची वेळ ही भद्रा आणि ग्रहण या दोन्ही दोषांपासून मुक्त आहे.
या मुहूर्तावर होळी पेटवण्याचे फायदे
भद्रा मुक्त काळात होळी पेटवल्याने कुटुंबातील जुने आजार आणि आर्थिक अडचणी दूर होतात. सध्या कुंभ राशीत असलेला ‘चतुर्गही योग’ आणि 3 मार्चचे ग्रहण यामुळे वातावरणात नकारात्मकता आहे. आज रात्रीची पूजा ही नकारात्मकता शोषून घेण्यास मदत करेल. प्रल्हादाप्रमाणेच अनिष्ट शक्तींवर विजय मिळवण्यासाठी हा मुहूर्त सिद्ध मानला जातो.
