Monday, March 2, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला मनपा स्थायी समिती सभापतीपदी विजय अग्रवाल !

अकोला मनपा स्थायी समिती सभापतीपदी विजय अग्रवाल !

अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध समित्यांचे सभापती निवडण्यासाठी आज सोमवारी विशेष सभा बोलविण्यात आली होती. सभापती पदांवरही भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे वर्चस्व कायम राहिले आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून अनेकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र आज विजय अग्रवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. शहर सुधार आघाडीतील भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि विरोधी पक्षाकडून काँग्रेस तर्फे मो.फजलू यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता.

महापालिकेत भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे ४३ नगरसेवक आहेत. महापालिका स्थायी समितीत १६ पैकी ९ सदस्य शहर सुधार आघाडीचे आहेत. अपेक्षेप्रमाणे शहर सुधार आघाडीच्या नऊ स्थायी समिती सदस्यांनी विजय अग्रवाल यांना मतदान केल्याने ते विजयी झाले. काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेस चार, वंचित आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक मत मिळाले. यावेळी देखील‘एआयएमआयएम’ च्या सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली.

नवनिर्वाचित सभापती विजय अग्रवाल यांनी या अगोदर देखील स्थायी समिती सभापतीपद सांभाळले आहे.सभापतीपदावर विजय अग्रवाल विजय झाल्याचे जाहीर करताच त्यांच्या समर्थकांसह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेत फटाके फोडून एकच जल्लोष केला.

अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती व प्रभाग समिती सभापती पदांसाठी निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा घेण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात महापालिका आयुक्तांनी पाठवला होता. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार अकोला महापालिकेच्या सभापती पदांसाठी निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आज सकाळी ११ वाजतापासून स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा मीना उपस्थित होत्या. स्थायी समिती सभापतीपदावर विजय अग्रवाल विजय झाल्याचे जाहीर करताच त्यांच्या समर्थकांसह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेत फटाके फोडून एकच जल्लोष केला. विजय अग्रवाल हे १५ वर्षांपासून नगरसेवक असून सभापती म्हणून आपली जबाबदारी वाढली असून शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लाऊन शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!