Sunday, February 22, 2026
No menu items!
No menu items!
Homeशिवमय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये साजरी

शिवमय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये साजरी

अकोला दिव्य न्यूज : गोदावरी बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित सन्मित्र पब्लिक स्कूल येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, धर्मरक्षक व आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत भक्तीभाव, उत्साह आणि दिमाखात साजरी करण्यात आली. संपूर्ण शाळा परिसर भगव्या पताकांनी सजला होता आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थितांनी केलेल्या शिवगर्जनेनी वातावरण अक्षरशः शिवमय झाले. इयत्ता दुसरीचा विद्यार्थी विघ्नेश शेगोकार व इयत्ता चौथीचा विद्यार्थी रुद्र खराबे यांनी शिवरायांची दिमाखदार वेशभूषा साकारून साक्षात शिवरायांचे दर्शन घडविले.

इयत्ता तिसरीचा विद्यार्थी रुद्र गोसावी आणि इयत्ता पहिलीचा विद्यार्थी समर्थ कुकडे यांच्या शिवगर्जनेने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तसेच वरद थोरात, आरुष कोगदे व प्रांजल शेगोकार यांनी शिवचरित्रावर आधारित जोशपूर्ण कविता सादर केली. स्वराज शिंदे, सृष्टी शित्रे, माही तेलगोटे व अर्णव चव्हाण यांनी शिवरायांच्या पराक्रम, दूरदृष्टी, शिस्तप्रियता व प्रजावत्सलतेवर प्रेरणादायी भाषणे सादर केली.

यूकेजीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने मने जिंकली. इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्म, अफजलखानावरील विजय आणि शिवराज्याभिषेक सोहळा यांचे नेत्रदीपक सादरीकरण करून सभागृहात टाळ्यांचा कडकडाट मिळविला. प्रत्येक सादरीकरणातून शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता चौथीची विद्यार्थिनी अंजली भटकर हिने आत्मविश्वासाने केले, तर इयत्ता चौथीचा विद्यार्थी अभिराज बोर्डे याने उपस्थितांचे आभार मानले. नृत्यदिग्दर्शन श्रावणी मोहोड व मीनल भाले यांनी उत्कृष्टरीत्या केले.

संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंग राजपूत व मुख्याध्यापिका मनीषा राजपूत यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी पार पडला. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वराज्याची प्रेरणा, राष्ट्रप्रेमाची जाणीव आणि आदर्श नेतृत्वगुणांची बीजे रुजली. खर्‍या अर्थाने हा दिवस शिवभक्ती, शौर्य आणि स्वाभिमानाचा उत्सव ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!