Sunday, February 22, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात धक्कादायक घटना ! 'रिल्स' स्टार होण्याचा नादात झाले गुन्हेगार

अकोल्यात धक्कादायक घटना ! ‘रिल्स’ स्टार होण्याचा नादात झाले गुन्हेगार

अकोला दिव्य न्यूज : आभासी जगाचं युवा पिढीला एवढा नाद लागला आहे की, यामुळे त्यांच आयुष्य आणि भविष्य धोक्यात आले आहे. ऑनलाइन गेमिंगमुळे धनवान होण्याचं व्यसन जडलेले शेकडो तरूण आर्थिक व मानसिक दृष्टया बरबाद झाले आहेत. यासोबतच सोशल मीडियावर रील्स बनवून रातोरात स्टार होऊन, झटपट लाखो रुपये कमावण्याचे स्वप्न अनेक जण बघतात आणि यातून गंभीर गुन्हे घडत असल्याचे उघडकीस येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना अकोला येथील जूने शहर परिसरातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका सोशल मीडिया ईन्फ्ल्यून्सर युवतीसह तीन युवकांना गजाआड केले आहे. या चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

फोटो सौजन्य : पोलीस छायाचित्रकार

या घटनेतील व गुन्ह्यातील फिर्यादी महिला ही वाशिम बायपास येथील सागर कॉलनी येथे राहणारी नेहा राजेश सावदेकर (वय ३०) असून आरोपी महिला ही शेजारी राहणारी समिक्षा गवई आहे फिर्यादी महिलेच्या शेजारी राहणाऱ्या आरोपी महिलेशी ओळख झाली होती. हळूहळू दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. आरोपी महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन करून दोघी मिळून इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी रील्स तयार करू लागल्या होत्या.

घटनेच्या दिवशी देखील रील बनवण्यासाठी आरोपी महिलेनी फिर्यादी महिलेला आपल्या घरी बोलाविले आणि रील शूट केले. काही वेळा नंतर फिर्यादी महिला घरी परत आल्यावर घरातून सोन्याचा नेकलेस (५२ ग्रॅम) सोन्याचे २ मोठे नेकलेस (४० ग्रॅम) सोन्याचे चेन व लॉकेट (१२ ग्रॅम)सोन्याचा ३ अंगठ्या (१५ ग्रॅम) सोन्याचे २ पोत(२० ग्रॅम) ब्रेसलेट (३ ग्रॅम) आणि लहान नेकलेस ( १८ ग्रॅम ) तसेच रोख रक्कम ९० हजार रुपये असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले. तेव्हा याबाबत जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.तक्रारीवरून पोलिसांनी अप नंबर ३८६/२०२६ कलम ३०५ भा.न्यासं.चा गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले.

या गुन्ह्याचा प्राथमिक तपासात तांत्रिक पुरावा मिळाला नाही आणि संशयीतने उडवाउडवीचे उत्तर देवुन तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु संशयिताच्या हालचालीचा मागोवा घेताना चोरी समिक्षा गवई हीने केल्याचा निष्कर्षाप्रत पोलीस पोहचले. दरम्यान गवई हिने हीरपूर येथील ऋतीक अजाबराव श्रृंगारेला (वय २२) अकोला बोलवले. तो त्याचा मित्र समीर प्रदीप तेलखडे (वय १९) सोबत आला. तेव्हा समिक्षा गवई व तिचा साथिदार वैभव संजय गोपनारायण (वय २३) यांनी अकोला येथील चिवचिव बाजारात मुद्देमाल त्यांचा सुपुर्द केला.अशी माहिती मिळताच दोन्ही संशयित आरोपींचा पाठलाग करून तपास पथकाने सापळा रचुन अमरावती येथून ताब्यात घेतले.

आरोपी महिलेसह तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.आरोपी महिलेने जबाब देताना सांगितले की, रिल शुट करताना तिने महिलेचे लक्ष विचलित केले व संधी मिळताच फिर्यादी महिलेच्या घरात घुसून अलमारीतून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे 20 लाखांचा ऐवज चोरून नेला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, जुने शहर पोलिसांनी आरोपींकडून तब्बल २१ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!