Friday, February 20, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील 'ट्रॉफिक' आणि 'सिग्नल' चा सावळा गोंधळ ! पोलिस वसुलीत गुंग

अकोल्यातील ‘ट्रॉफिक’ आणि ‘सिग्नल’ चा सावळा गोंधळ ! पोलिस वसुलीत गुंग

अकोला दिव्य न्यूज : शहरातील वाहतूक रहदारीचा पार बोजवारा उडाला असून, दरवेळी बदलून आलेले पोलीस अधीक्षक आणि रहदारी वाहतुक नियंत्रण शाखेत नव्याने रुजू झालेले निरीक्षक आपापल्या परीने बदल करूनही ही समस्या कायमच नसून दिवसेंदिवस विक्राळ रूप घेत आहे. वर्ष-दोनवर्षांत नवीन ट्रॉफिक सिग्नल आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतात. वर्तमानपत्रांतून पाठ थोपटून घेतली जाते आणि दोनचार महिन्यात सगळं ठप्प होऊन पुन्हा येरे माझ्या मागल्या…. ! आजवर यासाठी केलेल्या खर्चाची आकडेवारी (ऑडिट) काढली तर कुठं पाणी मुरते….

पोलिस प्रशासनाने शहरातील मुख्य चौकांमध्ये अलिकडच्या काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा नव्याने सिग्नल यंत्रणा सज्ज केली.आता रहदारी सुरळीत होईल असं वाटत असतानाच वाहतूक सिग्नलमुळे वाहतूकीचा विचका होऊ लागला. वाहतूक सिग्नल सुरळीतपणे बंद -सुरु होत नसल्याने वाहनचालक व सर्वसामान्यांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.असा आरोप अकोला महानगर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय तिवारी यांनी केला आहे.

सर्व वाहतूक सिग्नलमध्ये डावे सिग्नल उघडे ठेवण्यात आले आहे परंतु पुरेसे मार्गदर्शक चिन्हांकन नसल्याने डाव्या दिशेने जाणाऱ्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे, पूर्वी सिग्नल यंत्रणा क्लॉकवाईज सुरू होती. आता ती अँटी क्लॉकवाईज केल्याने सिग्नल समोर थांबून असलेले वाहनधारक गोंधळून जात आहेत. अनेकदा चारही बाजूचे सिग्नल लाल रंगाचे राहतात आणि मग वाहनधारक आपल्या गाड्या दामटत निघतात. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेकवेळा शिपाई नसतात आणि असले तरी मोबाइलवर मग्न किंवा सावज हेरण्याकडे लक्ष लागलेले असते.

नियमाप्रमाणे डाव्या बाजूच्या वळण्यासाठी रस्ता मोकळा असायला हवा. मात्र दिडशाहण्या चालकांमुळे तो ब्लॉक होतो. तेव्हा ड्युटीवर असलेल्या शिपायाने यासाठीचे कर्तव्य केले पाहिजे. रहदारीला अडथळा होत असल्याने वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई केली पाहिजे. तेव्हा वाहन चालकांवर वचक निर्माण होणार. यासाठी सातत्याने काम करणेही महत्त्वाचे आहे. मात्र ड्युटी पॉइंट सोडून आळीपाळीने काही शिपाई अकोला औद्योगिक वसाहतीत फेरफटका मारायला जातात आणि परतताना खिसा गरम करून कर्तव्यपूर्तीचा आनंद साजरा करतात.

जिल्हा पोलिस अधीक्षक आणि शहर उपअधीक्षक यांनी कुचकामी व्यवस्था, सदोष सिग्नल यंत्रणा आणि कुचराई करणारे कर्मचारी अशा एकूणच सर्व बाबींवर वाहतूक निरीक्षकांकडून कठोर नियोजन व नियंत्रण अंमलात आणली जावी. हकनाक होणाऱ्या गैरसोयीपासून वाहनचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!