अकोला दिव्य : ‘सहकाराचे तत्व जनहिताला महत्व’ या बिरुदाला सतत स्मरणात ठेवूनच आशिया खंडातील सहकार क्षेत्रात सर्वार्थाने प्रथम क्रमांकावर आणि लोकाभिमुख सामाजिक उपक्रमात अग्रेसर ‘बुलडाणा अर्बन’ या वैभवशाली पत संस्थेची अकोला शाखा उद्या गुरुवार 19 फेब्रुवारीपासून स्वमालकीच्या ‘बुलडाणा अर्बन भवन’ या प्रशस्त आणि देखण्या नवीन वास्तुमधून ग्राहकांना अधिक सक्षम सेवेत रुजू होत आहे.

गोरक्षण रोड पॉवर हाऊस लगत असलेल्या शाखेचे उद्या गुरुवार 19 फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता आयोजित स्थानांतरण सोहळ्यात अकोला जिल्हा पालकमंत्री ना.आकाश फुंडकर यांच्या हस्ते नवीन ‘बुलडाणा अर्बन भवन’ संस्थेचे सभासद, खातेदार, ठेवीदार आणि ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे. औपचारिक उद्घाटनानंतर येथील हॉटेल ग्रीनलँड येथे बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर यांच्या अध्यक्षतेत आयोजीत स्थानांतरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खा.अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर,वसंत खंडेलवाल, महापौर शारदा खेडकर उपस्थित राहणार आहेत.
बुलडाणा अर्बन ही केवळ एक आर्थिक व्यवहार करणारी संस्था नाही तर काटेकोर आर्थिक व्यवहाराची अमलबजावणी करण्यासह तेवढेच सजगपणे सामाजिक कार्यात देखील सक्रिय योगदान देणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे. बुलडाणा अर्बनशी आर्थिक व्यवहार केल्यास….आपणास सामाजिक उतरदायित्व निभावल्याचे समाधान मिळू शकते.काही शेतकऱ्यांची धान्ये सुरक्षीत राहु शकतात. काही गाईचे प्राण वाचू शकतात.काही गरीबांची मुले उच्च शिक्षण घेऊ शकतात.काही रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहचू शकतात. काही बेवारस प्रेतांचे त्यांच्या प्रथेप्रमाणे अंतसंस्कार होऊ शकतात. काही वृक्ष पर्यावरणाचे संतुलन राखू शकतात.काही बंदी बांधवांना सुधारण्याची संधी मिळू शकते. हे सर्वकाही बुलडाणा अर्बन राबवत असलेल्या विविध उपक्रमांमुळेच !
प्रत्येक कुटुंबासाठी… कुटुंबातील प्रत्येकासाठी या तत्त्वावर कार्यरत बुलडाणा अर्बन संस्थेचे बीजारोपण १९८६ रोजी बुलढाणा सारख्या लहानशा गावात केले आणि आज एकूण ठेवी १४ हजार ९९० कोटी रुपये तर सभासद संख्या १८ लाख एवढी आहे. एकूण कर्ज वाटप ११ हजार १६० कोटी रुपये आणि एकूण शाखेची संख्या ४७८ वर पोहोचली. यासोबतच ४६५ गोदाम, १० शितगृह (कोल्ड स्टोअरेज) बुलडाणा अर्बनच्या सक्षमीकरणाची साक्ष आहे. विशेष म्हणजे या संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच संस्थापक अध्यक्ष भाईजी उपाख्य राधेश्याम चांडक यांनी सामाजिक बांधिलकीची नाळ देखील घट्ट धरून ठेवली. हाच वसा संस्थेचे वर्तमान अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, मुख्य संचालक, वरिष्ठ अधिकारी, शाखा सदस्य, शाखा व्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचारी कायम राखून वाटचाल करत असल्याने ‘बुलडाणा अर्बन’ रुपी वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीत खोलवर रूजत चालली आहेत.
