अकोला दिव्य न्यूज : नुकत्याच संपन्न झालेल्या नरनाळा महोत्सव २०२५-२६ च्या आयोजनात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी सहपत्नीक संपूर्ण एक दिवस सहभागी झाले होते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तक्रारीची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे.

तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी २०२५ रोजी ‘Narnala Festival-2025-26’ साठी निविदा प्रक्रिया पार पडली होती. मात्र निविदेत नमूद तांत्रिक अटी व शर्तीनुसार आवश्यक उपकरणे आणि सेवा पुरवण्यात गंभीर त्रुटी राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नागरिकांना दाखवण्यासाठी एलईडी वॉल, प्रोसेसर तसेच ध्वनी व्यवस्थेबाबत निविदेत नमूद क्षमतेपेक्षा कमी दर्जाची उपकरणे वापरण्यात आल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात 12 बाय 24 आकाराचे 6 एलईडी वॉल लावणे अपेक्षित असताना केवळ 8 बाय 16 आकाराचे एलईडी वॉल या ठिकाणी लावण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच मुख्य मंचावर 12 बाय 70 फुटांची एलईडी स्क्रीन लावणे अपेक्षित होते. कंत्राटानुसार सुमारे 2800 स्क्वेअर फूट स्क्रीन बसवणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात केवळ 1600 स्क्वेअर फूट स्क्रीन लावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधित बिलांमधून रक्कम वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. कमी उपकरणे बसवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करून भविष्यातील निविदांमधून अपात्र ठरवावे, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने तक्रारीची दखल घेतली असली तरी स्थानिक प्रशासनाकडून याबाबत प्रत्यक्ष चौकशी सुरू होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
