Tuesday, February 17, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात इंग्रजांनी १८६६ मध्ये स्थापना केलेल्या नगर पालिकेत २०१२ मध्येच 'टिपू सुलतान'...

अकोल्यात इंग्रजांनी १८६६ मध्ये स्थापना केलेल्या नगर पालिकेत २०१२ मध्येच ‘टिपू सुलतान’ सभागृह

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण टिपू सुलतान यांच्या नावावरून सध्या चांगलेच तापले असून, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुलगी गार्गी सपकाळ हिने समोर येत भाजपचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. काँग्रेसने पलटवार सुरू केले असताना, तत्कालीन इंग्रज सरकारने अकोला शहरात २५ जून १८६६ रोजी स्थापित केलेल्या तत्कालीन अकोला म्युनिसिपल कमिटीच्या कारभारासाठी बांधलेल्या इमारतीत म्हणजे आजच्या अकोला महापालिकेच्या स्थायी समितीचे सभागृह आहे. या सभागृहाचे वर्षं २०१२ मध्ये ठराव मंजूर करून घेत ‘टिपू सुलतान’ सभागृह असं नामकरण करण्यात आले होते. ही बाब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या सभागृहाच्या नावावरून काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले.तर हे सर्व काँग्रेसवाल्यांचे काम असल्याचे प्रत्युत्तर भाजपने दिले असले तरी ‘टिपू सुलतान’ सभागृहाच्या नामकरणाचा इतिहास ताजा होऊन त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे दोघे समकक्ष असल्याचे वक्तव्य करून राज्यात नव्या वादाला तोंड फोडले. या प्रकरणावरून भाजपने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान काँग्रेस नेते व प्रवक्त्यांनी सुद्धा भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी विविध मुद्दे समोर केले. त्यामध्ये अकोला महापालिकेतील स्थायी समिती सभागृहाला ‘शहिदे वतन हजरत टिपू सुलतान’ हे नाव महाराष्ट्रभर चर्चेत आले.

अकोला महापालिकेच्या वर्ष २०१२ च्या निवडणुकीत ७३ संख्या असलेल्या महापालिकेत भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी १८ नगरसेवक निवडून आले होते. स्पष्ट बहुमत कुठल्याही पक्षाकडे नव्हते. महापौरपद आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्ग निघाले होते. या निवडणूक दरम्यान झालेलं राजकारण व पॉवर गेम नंतर काँग्रेस, वंचित, स्वतंत्र समिती व इतरांनी मिळून सत्तास्थापन केली. त्यावेळी २० जून २०१२ रोजी झालेल्या सभेत अकोला मनपा स्थायी समिती सभागृहाला ‘शहिदे वतन हजरत टिपू सुलतान’ हे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. त्यावरून मोठा वाद देखील झाला होता.आता टिपू सुलतान यांच्या संदर्भात सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून झालेल्या वादात अकोला महापालिकेतील ‘टिपू सुलतान’ सभागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी हाच धागा पकडून भाजपवर टीका करताना भाजपच्या काळात टिपू सुलतान यांची नावे कुठे व कशी दिली गेली? त्यात कोणी, कसा पुढाकार घेतला, हे सांगितले. २०१२ मध्ये अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचे नाव ‘शहीद-ए-वतन शेर-ए-म्हैसूर टिपू सुलतान’ ठेवण्याचा ठरावाचे सूचक माजी महापौर व सध्याचे भाजपचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल होते.असे सावंत यांनी स्पष्ट सांगितले. यासोबतच २०१३ मध्ये मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला ‘शहीद टिपू सुलतान मार्ग’ नाव देण्याच्या भाजप नगरसेवकाच्या प्रस्तावासाठी भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. त्यात मुंबईच्या सध्याच्या महापौर रितू तावडे यांचे नावही होते.

२००१ साली अंधेरी (प) येथे ‘शेर-ए-म्हैसूर टिपू सुलतान’ मार्ग नामकरणाचा ठराव भाजपचे माजी खा. गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत एकमताने मंजूर झाला होता. भाजप नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले होते. २०१७ मध्ये कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही टिपू सुलतानाकरिता गौरवोद्गार काढले होते अशी काही उदाहरणे सावंत यांनी दिली. यासाठीची कागदपत्रेदेखील त्यांनी माध्यमांना दिली. हे खोटे असेल तर भाजपने पुराव्यानिशी सांगितले पाहिजे, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल.असं आव्हान सावंत यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!