अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील जेष्ठ धन्वंतरी आणि जुन्या पिढीतील निष्णात सर्जन व प्रसिद्ध डॉक्टर व प्रतिभावान व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. अरूण वसंतराव भागवत यांचे आज रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.रुग्णसेवा व वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान आणि मूल्यांप्रती असलेली त्यांची निष्ठा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आज महाशिवरात्रीला त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

अकोला शहरातील जुन्या पिढीतील ख्यातनाम धन्वंतरी पैकी एक आणि कुशल सर्जन व भागवत डॉक्टर असं म्हणून अलिकडच्या काळापर्यंत शहर व ग्रामीण भागातील व रूग्णाचा नितांत विश्वास असलेले डॉ. भागवतांनी आपली अमिट छाप सोडली आहे.त्यांच्या मागे पत्नी डॉ. कल्पना भागवत, मोठे पुत्र डॉ.नरेंद्र भागवत, सून नम्रता भागवत, धाकटे पुत्र डॉ. अभिषेक भागवत, सून हिता भागवत आणि नातनांतवंडासह मोठा आप्तपरिवार आहे.
अकोट तालुक्यातील मनबदा सारख्या छोट्या गावातून जीवनाची सुरुवात करणाऱ्या अरुण भागवत यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे अनेक रुग्णांची शस्त्रक्रिया करून त्यांनी त्यांचे प्राण वाचविले आहेत, गावासाठी काहीतरी करण्याची त्यांची अफाट इच्छा जवळून बघितली आहे.मुलांनाही त्यांनी त्याच पद्धतीने घडविले आहे. त्यांचे राज्यभर नेटवर्क फार छान होते. मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये आपल्या भागातील रुग्णांसाठी त्याचा अनेकदा फायदा झाला, ज्यावेळी कुणीच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी धजावत नव्हते त्या काळात बहुजन समाजातील या वैद्यकीय क्षेत्रातील नवयुवक डॉक्टराने केलेले कार्य हे निश्चितच अधोरेखित करण्यासारखे आहे.
रुग्णसेवेत सदैव तत्पर राहून, भागवत यांनी सामाजिक कार्यात देखील सक्रिय योगदान होते.आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील सत्य साईबाबा हे डॉ भागवत यांचे आध्यात्मिक गुरु होते. १९८६ मध्ये अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे सत्य साईबाबा यांचा सत्संगाचे आयोजन भागवत यांनी केले होते. दरम्यानच्या काळात डॉ. भागवत कॉंग्रेस पक्षातही सक्रिय सहभाग होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे भागवत ख-या अर्थाने एक परोपकारी व्यक्ती होते,
गोरक्षण रोड येथील वत्सल हॉस्पिटल येथून डॉक्टर भागवत यांची अंत्ययात्रा सायंकाळी काढण्यात येऊन अकोला-गायगाव येथील फार्म हाऊस लगतच्या शेतात नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी व हितचिंतकांच्या उपस्थितीत त्यांचा पार्थिवावर ५.३० वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
