अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील ख्यातनाम दि.बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीची पुढील ३ वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी आज झालेल्या मतदानाची रात्री उशिरापर्यंत मतमोजणी होऊन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष अँड मोतीसिंग मोहता तिसऱ्यांदा विजयी झाले. अत्यंत अटीतटीच्या लढतीत मोहता यांनी १४८ मतें घेऊन विजय खेचून आणला. जेष्ठ उपाध्यक्षपदी विजयकुमार तोष्णीवाल आणि मानद सचिव म्हणून पवन माहेश्वरी यांची अगोदरच झालेली अविरोध निवड आज जाहीर करण्यात आली.

बीजीई सोसायटी संचालित अकोला येथील आर.एल.टी सायन्स कॉलेज व कारंजा येथील किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालय अशा दोन मतदान केंद्रावर आज रविवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. दुपारी ३ वाजता मतदानाचा कालावधी संपेपर्यंत एकुण ३१९ पैकी २६१ मतदार सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.झालेल्या मतदानापैकी २८ मतदारांनी कारंजा येथे मतदान केले. अकोला येथील केंद्रावर २३३ मतदारांनी मतदान केले.
अकोला येथे आर.एल.टी सायन्स कॉलेजच्या सभागृहात सायंकाळी मतमोजणीला सुरुवात होऊन निवडणूक रिंगणात अध्यक्षपदासाठी मावळते अध्यक्ष अँड मोतीसिंग मोहता आणि माजी अध्यक्ष डॉ. आर.बी. हेडा यांच्यातील काट्याचा लढतीत डॉ. हेडा यांना ११८ मते मिळाली. अँड मोहता यांना १४८ मते मिळाली आणि त्यांनी तब्बल ३० मतांनी विजय मिळविला. कनिष्ठ उपाध्यक्षपदासाठी शरद चवरे आणि अभिजीत परांजपे यांच्यात झालेल्या लढतीत अभिजीत परांजपे विजयी झाले. विजयी उमेदवार परांजपे हे मोहता पॅनलचे असून सहसचिव पदासाठी डॉ. रविंद्र जैन आणि अमित सुरेका यांच्यात झालेल्या सामन्यात अमित सुरेखा यांनी विजय मिळविला. विजयी उमेदवार सुरेका हे डॉ. हेडा यांच्या पॅनलचे आहेत.
कार्यकारिणी सदस्य म्हणून ललित अग्रवाल, श्रीकृष्ण अमरावतीकर, अँड.संजय अटल, अभय बिजवे, मनोज बिसेन, आनंद चांडक, करण चीमा, गोविंद कागलीवाल, डॉ.अजय कांत,राहुल महाजन, अँड.सुशील कुमार शर्मा, नरेंद्र बाहेती विजयी झाले. निवडून आलेल्या १२ कार्यकारिणी सदस्य मध्ये अँड. मोहता यांचा पॅनलचे एकमेव करण चीमा विजयी झाले. उर्वरित ११ सदस्य डॉ. हेडा यांच्या पॅनलचे आहेत.
संपुर्ण निवडणुक प्रक्रिया अँड. उल्हास कविश्वर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
