Sunday, February 1, 2026
No menu items!
No menu items!
Homeसंघ-भाजपशी जुना संबंध ! महापौरांच्या सासू होत्या बाळापूर पं.स.च्या सभापती

संघ-भाजपशी जुना संबंध ! महापौरांच्या सासू होत्या बाळापूर पं.स.च्या सभापती

अकोला दिव्य न्यूज : अकोला महानगरपालिकेच्या ९ व्या आणि सहाव्या महिला महापौर म्हणून निवड झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका शारदा खेडकर यांच्या कुटुंबाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचे जुने ऋणानुबंध आहेत. इतर मागास वर्ग (ओबीसी) महिला प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाल्यानंतर खेडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

महापौरपदाची माळ पुन्हा महिलेकडे गेल्याने महानगरपालिकेच्या राजकीय इतिहासात महिलांचे वर्चस्व कायम आहे. आतापर्यंत पाच महिलांनी शहराच्या प्रथम नागरिक म्हणून प्रतिनिधित्व केले असून, शारदा खेडकर यांच्या निवडीमुळे ही संख्या आता सहावर पोहोचली आहे. खेडकर परिवाराचा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेक वर्षांपासून संबंध राहिला आहे. शारदा खेडकर या भाजपच्या अनुभवी नगरसेविका असून, भाजपकडून ही त्यांची दुसरी नगरसेवक पदाची टर्म आहे. पक्ष संघटनेतील कामकाज, प्रभागातील प्रश्नांबाबत सातत्याने केलेला पाठपुरावा आणि सामाजिक उपक्रमांमुळे त्यांनी महापौरपदापर्यंतचा टप्पा गाठल्याचे बोलले जात आहे.

महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच नागरी सुविधा या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे खेडकर यांनी निवडीनंतर सांगितले. प्रशासन आणि सत्ताधारी पक्षातील समन्वयातून विकासकामांना गती देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

शारदा- रणजित यांचं दाम्पत्याचे संघटनेत कार्य. महापौर शारदा खेडकर यांनी भारतीय जनता पार्टीत महिला आघाडीच्या सचिव म्हणून कार्य केले आहे. त्यांचे पती रणजित खेडकर हेही भारतीय जनता पार्टीत अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी जिल्हा सरचिटणीस पदावर काम केले असून, सध्या ते गौरक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर शारदा खेडकर यांच्या महापौरपदाच्या निवडीकडे संघ-भाजपच्या दीर्घकालीन संघटनात्मक कार्याची ‘फलश्रुती’ म्हणून पाहिले जात आहे.

महापौर शारदा खेडकर यांच्या सासू शिलाताई खेडकर यांनीही राजकीय जीवनात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्या बाळापूर पंचायत समितीच्या सभापती, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा तसेच उपाध्यक्षपदावर कार्यरत राहिलेल्या आहेत. त्यामुळे खेडकर कुटुंबाला राजकीय वारसा लाभलेला असून, आता शारदा खेडकर यांना महापौर पद भूषविण्याची संधी मिळाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!