अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिका सत्तेच्या सारीपाटावरचा डाव अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने शहर सुधार समितीच्या माध्यमातून जिंकला. आज शुक्रवार ३० जानेवारीला महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पक्षाचे ३८ नगरसेवकांसह शहर सुधार समितीत सहभागी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ शिंदे शिवसेनेचे एक तसेच एक अपक्ष आणि भाजप विरोधात जिंकलेला एक नगरसेवक याप्रमाणे गठ्ठा मतं घेऊन भाजपच्या नगरसेविका शारदा रणजित खेडेकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांचा ४५ मतांनी दणदणीत विजय मिळविला.कॉंग्रेस आघाडीच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांना ३२ मते मिळाली. दरम्यान असुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमआयएमचे ३ नगरसेवक तटस्थ राहिले.

विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी विरोधकांकडून विविध पातळ्यांवर जोरदार हालचाली, संपर्क आणि राजकीय जुळवाजुळव सुरू होती. मात्र एमआयएमचा तटस्थ निर्णय व अपक्ष नगरसेवक पवित्रकारचा भाजपला मिळालेला पाठिंबा या दोन घटकांनी विरोधकांच्या सर्व गणितांवर पाणी फेरले. परिणामी, भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे संख्याबळ ४५ वर स्थिरावले आणि विरोधकांना अनपेक्षित धक्का बसला.

अकोला महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी झालेल्या सभेत पीठासीन अधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. सभेत उपस्थित नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सहमतीने दोन्ही पदांसाठी हात उंचावून मतदान घेतले. अकोला महापालिका महापौरपदासाठी शहर सुधार समितीतर्फे शारदा रणजित खेडकर यांची बहुमताने निवड झाली.भाजपच्या खेडकर यांना ४५ मते मिळाली तर विरोधी पक्षाच्या आघाडीला सुरेखा काळे यांना ३२ मते मिळाली.
उपमहापौर पदी शहर सुधार समितीचे अमोल गोगे यांना ४५ मते मिळाली तर कॉंग्रेस आघाडीचे आजाद खान (अलीयार खान) यांना ३२ मते मिळाल्याने गोगे विजय झाले. या प्रक्रियेत एमआयएमचे ३ नगरसेवक तटस्थ राहिले.मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज केले. निवडणूक प्रक्रियेत एमआयएम नगरसेवकांनी तटस्थ राहून भाजपला अनुकूल भूमिका घेतल्याचा आरोप करीत कॉंग्रेस पक्षाच्या मुस्लिम महिला नगरसेविकांनी रोष व्यक्त केला.
सर्व छायाचित्र: संकेत शर्मा अकोला.
या निकालामुळे स्पष्ट झाले आहे की, महापालिकेतील सत्ता केवळ संख्येवर नाही, तर योग्य वेळी घेतलेल्या राजकीय निर्णयांवर ठरते.
