अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : महाराष्ट्राच्या राजभवनात एका भल्या सकाळी शपथ घेऊन अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला परंतु बुधवार २८ जानेवारीला भल्या सकाळी दादांनी जो धक्का दिला, त्या धक्क्यातून येत्या काही वर्षांपर्यंत महाराष्ट्र निश्चितच सावरणार नाही. या धक्क्याने एका तडफदार नेत्याला आपण गमावले आहे. असा एखादा नेता घडण्यासाठी कित्येक वर्षे जातात. राजकारणाच्या आखाड्यात सुमारे पाच दशके असूनही, आपल्या शब्दाचा महिमा अजित पवारांनी कायम ठेवला होता. दादा जे बोलतात, तेच करतात, ही त्यांची ख्याती होती. जे अशक्य आहे, ते स्पष्ट शब्दात सांगणार. मात्र, एकदा शब्द दिला की ते काम तडीस नेणार, ही खात्री होती. त्यामुळेच सर्वंच क्षेत्रात ‘दादा माणूस’ ही त्यांची ओळख होती. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही ते आपले ‘दादा’ वाटत.

सामान्य माणूस हा लोकशाहीत मालक आहे, याबद्दल दुमत नव्हते. त्यामुळे एखाद्या कर्तबगार स्टेट्समनप्रमाणे ‘नो नॉनसेन्स’ अशा पद्धतीने ते काम करत राहिले. आजच्या भरकटलेल्या राजकारणात त्यांनी आपली राजकीय नैतिकता ढासळू दिला नाही. जात वा धर्माचे राजकारण त्यांनी कधी केले नाही. संसदीय राजकारणाची शिस्त दादांना माहीत होती. आपल्या मनात काय आहे, याचा इतरांना पत्ता लागता कामा नये, हे अनेक राजकीय नेत्यांचे स्वभाव वैशिष्ट्य. दादा मात्र कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेटपणे बोलणारे. जे पोटात आहे, तेच ओठात आणणारे. त्याची काय किंमत चुकवावी लागेल, याचा जराही विचार न करणारे. महाविकास आघाडीत असोत की महायुतीत, आपली थेट भूमिका त्यांनी कधी लपवून ठेवली नाही. कार्यकर्त्यांचे ते लाडके ‘दादा’ झाले, ते याच कारणाने. दिलेला शब्द पाळणे, कार्यकर्त्यांना प्रेमाने जपणे आणि काम करेल त्याला संधी देणे या स्वभावामुळे अजित पवारांना असा जनाधार मिळू शकला.

महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्रिपद पहिल्यांदा आले ते १९७८ मध्ये. बॅ. नासिकराव तिरपुडे हे पहिले उपमुख्यमंत्री. त्यानंतर अलीकडच्या इतिहासात हे पद अजित पवारांसाठीच तयार केले आहे असे वाटावे, इतक्या वेळा त्यांनी ते मिळवले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असोत की देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे असोत की एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आपला ठसा उमटवला. अजित पवारांचे राजकारण आकाराला आले ते बारामती तालुक्यात. त्यामुळे ते ग्रामीण भागातील नेते. आपला हा ग्रामीण बाज त्यांनी कधी लपवला नाही. उलटपक्षी अभिमानाने मिरवला. त्यांच्या वक्तृत्वाचे अनेक चाहते होते. भाषण असो की पत्रकार परिषद, आपल्या खास रांगड्या आणि खेळकर शैलीत अजित पवार बोलत.राजकारणात विखार वाढत असताना आणि शह-काटशह म्हणजे राजकारण असा समज झालेला असताना, अजित पवारांचा हा दिलखुलास मोकळेपणा त्यांच्या विरोधकांनाही आवडत असे.

अजित पवारांचे हे असे व्यक्तिमत्त्व घडले, ते त्यांच्या प्रवासामुळे. ते राजकारणात १९८२ मध्ये आले. अगदी गावापासून सुरुवात केल्याने त्यांना जमिनीवरचे वास्तव माहीत होते. तो काळही वेगळाच !वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, बॅ. ए. आर. अंतुले अशा नेत्यांचे राजकारण अजित पवार बघत होते. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, भाई वैद्य, ग. प्र. प्रधान असे तगडे विरोधक देखील जवळून पाहिले होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात खिलाडूपणे राजकारणात कुस्ती करायची. जिंकण्यासाठी डाव टाकायचे. मात्र, विजय असो की पराभव, दोन्ही मान्य करून दोघांनीही लोकांसाठी काम करायचे, असा तो काळ होता. स्वातंत्र्यलढ्यातून प्रेरणा घेऊन उदयाला आलेले राजकारणही अजित पवारांनी पाहिले आणि एकविसाव्या शतकासोबत व्यावसायिक झालेल्या राजकारणातही ते टिकून राहिले. जुन्या प्रेरणा घेऊन नव्या काळाला सामोरे जाताना, लोक हा केंद्रबिंदू कधी सुटला नाही. त्यांचा दरारा होता; पण अर्ध्या रात्री धावून येणारा हाच दादा आहे.
१९९१मध्ये अजित पवार सर्वप्रथम खासदार झाले. मात्र, शरद पवारांना केंद्रात जायचे असल्याने, त्यांच्यासाठी अजित पवारांनी लोकसभा सोडली आणि ते विधानसभेत आले. अजित पवार राजकारणात आले ते शरद पवारांचे बोट पकडून. तेव्हा शरद पवारांचे नाव दुमदुमत होते. वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी मुख्यमंत्री झालेल्या या तरुण नेत्याने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्या काळात तरुण अजित पवार राजकारणाची बाराखडी गावच्याच मातीत गिरवत होते. आधी पुणे जिल्हा सहकारी बॅंक, मग दूध संघ असे करत ते लोकसभेत पोहोचले. लोकसभेतून विधानसभेत आले. लगेच मंत्रीही झाले.
१९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यावेळी त्यांच्यासोबत तरुण नेत्यांची जी फळी होती, त्यात अजित पवार अतिशय प्रभावी होते. अल्पावधीतच त्यांनी पक्षावर मांड ठोकली. प्रशासनावर पकड मिळवली. महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते म्हणून ते उदयास आले. २००४ मध्ये काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक जागा मिळवल्या. या विजयात अजित पवारांचा मोठा वाटा होता. शरद पवारांसारखा वटवृक्ष असतानाही, अजित पवारांनी त्या सावलीत न वाढता आपली स्वतंत्र ओळख तयार केली. स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित केले. त्यांचे महाराष्ट्राचे आकलन विलक्षण होते.फायलींच्या गाठी उकलून कामे कशी पूर्ण करायची, याचा आवाका थक्क करणारा होता.विविध विभागांचे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपला ठसा उमटवला, तो त्यामुळेच अजित पवार दहा मिनिटे ‘नॉट रिचेबल’ झाले, तरी बातमी व्हायची. तेच अजितदादा आता कायमचे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत ! कर्तबगार अशा असामान्य लोकनेत्याला आपण गमावले आहे. ‘अकोला दिव्य ’ परिवाराच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली
