अकोला दिव्य न्यूज : १३ वा शिवधारा महोत्सव परमपूज्य संत डॉ. संतोषदेव महाराज यांच्या पवित्र उपस्थितीत येत्या ३० आणि ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी सिंधी कॅम्प येथील पक्की खोलीमध्ये संत कंवरराम मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे, यंदाही महाराज श्रींच्या आध्यात्मिक प्रवचनासह, उत्सवादरम्यान बाईक रॅली, मंगल कलश यात्रा काढण्यात येणार आहे. शनिवार ३१ जानेवारीला आयोजित शिवधारा आरोग्य शिबिरात ह्रदय रोग तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ, तसेच थायरॉईड ऑर्थो, दंत, त्वचा आणि संपूर्ण शरीर तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन आणि होमिओपॅथिक डॉक्टर रूग्णाची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. आरोग्य शिबिरांसाठी मोफत नाव नोंदणी आसवानी झेरॉक्स सेंटर, पक्की खोली येथे सुरू आहे.
या तीन दिवसीय महोत्सवात भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचा समारोप रविवार, १ फेब्रुवारी रोजी केला जाणार असून मुलांसाठी रंगभरो स्पर्धा आणि सामूहिक जनेऊ संस्कार तसेच कुट्टी प्रसाद, महाआरती, फुलांची होळी, भोग साहेब आणि विशेष संकल्प पल्लव साहेब होणार आहे. तीन दिवसांच्या कार्यक्रमांची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत आहे. अकोला सिंधी समाज आणि शिवधारा समितीकडून भाविकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
विशेष आकर्षण म्हणजे रविवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता महाराज श्रींनी तुलादान (नाणे-दान अर्थात कलदार) आयोजित केले आहे.
