अकोला दिव्य न्यूज : राष्ट्रभक्तीच्या वातावरणात, संपूर्ण जल्लोषात अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयात ७७ वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मानद सचिव नितीन बियाणी यांनी उपस्थितांचे स्वागत करत ‘संविधान की शक्ति से चलता हैं देश हमारा , उद्योग, श्रम और संकल्प से सवंरता है भविष्य सारा’ या दोन प्रेरणादायी ओळी सादर करून अध्यक्ष मनोज खंडेलवाल यांना ध्वजारोहणासाठी आमंत्रित केले. अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला संघटनेचे कार्यकारिणी सदस्य गिरीश जैन तर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या पुतळ्याला उद्योजक सदस्य शैलेश पाटील यांनी हार अर्पण करून अभिवादन केले.
अध्यक्ष मनोज खंडेलवाल यांनी उपस्थितांना संबोधित करत उद्योग क्षेत्रातील शिस्त, सुरक्षा व राष्ट्रनिर्माणातील उद्योजकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. यावेळी एम.आय.डी.सी अग्निशामक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उद्योग क्षेत्रात उद्भवणारी आपत्कालीन स्थिती, अग्नि सुरक्षा उपाययोजना, फायर ब्रिगेडच्या वाहनांची कार्यप्रणाली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी दोन फायर ब्रिगेड गाड्या व एक अॅम्बुलन्स त्यांच्या संपूर्ण टीमसह उपस्थित राहून ध्वजाला सलामी दिली.
कार्यक्रमाला अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष उन्मेश मालू, द्वारकादास चांडक, उपाध्यक्ष नरेश बियाणी, सह-उपाध्यक्ष कमलेश अग्रवाल, कोषाध्यक्ष रितेश गुप्ता यांच्यासह कार्यकारिणी सदस्य किशोर अग्रवाल, अमित बंसल, महेंद्र पुरोहित,चेतन अग्रवाल, लक्ष्मीकांत डागा,अजय खंडेलवाल, संजय श्रावगी, विष्णू खंडेलवाल, कृष्णा खटोड, अमित सराफ, पंकज राठी, संजय अग्रवाल, विठ्ठल पोहनकार, केशव खटोड, जयेश बोरा, कृष्णा खाडे, आशिष चौखंडे, श्रेणिक जैन, पार्थ शाह, व्ही.राजोरिया, तुषार चांडक, मुकेश राठी, रामनरेश प्रजापती, अखिलेश पांडेय तसेच मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मानद सचिव नितीन बियाणी यांनी केले.
