Friday, March 13, 2026
No menu items!
No menu items!
Homeकायद्याला संवेदनेचा साज ! DSP गजानन शेळके यांना राष्ट्रपती पोलीस पदक

कायद्याला संवेदनेचा साज ! DSP गजानन शेळके यांना राष्ट्रपती पोलीस पदक

अकोला दिव्य न्यूज : कायद्याच्या चौकटीत मात्र संवेदनेचा साज चढवून महाराष्ट्र पोलीस दलात ३३ वर्षाच्या प्रदिर्घ काळापासून निर्विवाद व निर्विघ्नपणे नियुक्ती झालेल्या ठिकाणी आपलं कर्तव्य चोखपणे पार पडण्यासोबत समाजाभिमुख आणि पथदर्शी उपक्रम राबवणाऱ्या बोटावर मोजता येतील इतक्या अधिका-यांपैकी एक असलेले अकोला जिल्हा पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांनी केलेल्या कार्याची केंद्रीय गृहमंत्रालयाला दखल घेणे क्रमप्राप्त ठरले. अमरावती परिक्षेत्रातून राष्ट्रपती पदकासाठी शेळके यांची निवड करण्यात आली. या सन्मानासाठी निवड झालेले गजानन शेळके एकमेव उपअधीक्षक ठरले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून पोलीस, अग्निशमन, होमगार्ड व सुधारात्मक सेवांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शौर्य व सेवा पदके जाहीर केली जातात. यंदा देशभरातून ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध पदके जाहीर झाली असून महाराष्ट्रातील ८९ जणांचा त्यात समावेश आहे. भारतीय गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी सेवेबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक उपअधीक्षक गजानन शेळके यांना जाहीर झाले आहे. गेल्या ३३ वर्षांपासून शेळके पोलीस दलात कार्यरत असून त्यांनी भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळ व वाशीम आदी जिल्ह्यांमध्ये विविध पदांवर सेवा बजावली आहे.

कर्तव्य पूर्ती आणि नागरिकांशी संवाद यावर भर देत त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. ‘पोलिस मित्र’, ‘एक कॉल करा, मदत मिळवा’ यांसारख्या संकल्पनांमुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास त्यांनी अधिक दृढ केला. अकोला शहरात कोरोना काळात ‘नो मास्क, नो सवारी’ ही मोहीम राबवून त्यांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली होती.या उपक्रमाची महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनीही विशेष कौतुक केले होते.

दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेची मिळालेल्या जबाबदारीने त्यांनी या खात्यात शिस्त आणि संयम लावली. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेत, रहदारी नियंत्रण आणि दुचाकी, चारचाकी व जड वाहन या वाहनचालकांना वाहतूक कायद्याचे पालन करण्यास बाध्य केले. बुलेटच्या सायलेन्ससरमध्ये बदल करून शहरात कर्कश्श आवाजाचा उच्छाद मांडणा-या युवकांना असं काही वठणीवर आणले की, आजपर्यंत तो दरारा कायम आहे.

बीनचुकपणे पोलिस खात्यातील जबाबदारी पार पाडत असताना, उपजत असलेला ‘गीत गायन’ हा कलागुण न चुकता जोपसत अकोला शहरात गायक कलावंतांचा एक संच देखील शेळके यांनी निर्माण केला आहे. पोलिस उपअधीक्षक पदावर बढती मिळाल्यावर वाशिम येथे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक म्हणून कार्य करताना आपली छाप सोडली आहे. सध्या अकोला जिल्ह्यातील जात पडताळणी विभागाच्या दक्षता पथकात कार्यरत पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांना हा बहुमान प्राप्त होणे निश्चितच या खात्यातील नवीन पिढीला प्रेरणा देणारा आहे.

कायद्याचा बाज आणि संवेदनशील मन, असं अजब रसायन असलेले पोलिस उप अधीक्षक गजानन शेळके अनेक वर्षांपासून अकोला दिव्य परिवारातील एक सदस्य आहेत. त्यांना मनस्वी शुभेच्छा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!