Saturday, January 24, 2026
No menu items!
No menu items!
Homeआज अकोल्यात विरोधी पक्ष एकजुट होणार ! राजकारणाला कलाटणी की.........

आज अकोल्यात विरोधी पक्ष एकजुट होणार ! राजकारणाला कलाटणी की………

अकोला दिव्य न्यूज : कट्टर हिंदुत्ववादी असं बिरूद मिरवणाऱ्या भाजप व ‘एआयएमआयएम’च्या युतीच्या राजकारणाचा ‘अकोट पॅटर्न’ उघडकीस आले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंबी देताच अकोटची युती मोडली. मात्र हा राजकीय ‘याराना’ देशभरात गाजत असताना, अचलपूर नगरपालिकेत पुन्हा ‘एमआयएमआयएम’ सोबतच भाजपने सत्तेची वाटणी केली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथ येथे कॉंग्रेससोबत, अकोटला आणि आता अचलपूर नगरपालिकेत असुद्दीन ओवैसीच्या एमआयएमआयएम सोबत भाजपने केलेल्या हिस्सा वाटणीमुळे आता विरोधकांवर अभद्र युती वा आघाडीचा आरोप लावणं भाजपला जरा अवघड झालं आहे. भाजपने सत्तेसाठी असुद्दिन ओवैसी सोबतच्या सत्ता वाटणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी होत आहेत.

अकोला दिव्य ग्राफिक्स

दरम्यान अकोला महापालिकेच्या निवडणुकीत एकीकडे ३८ जागा जिंकत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले असले तरी बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही. दुसरीकडे राजकारण व विचारधारेचे कट्टर विरोधक भाजप व ‘एआयएमआयएम’ पक्षांचे नगरसेवक उघडपणे सत्ता समीकरणासाठी एकत्र आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अकोला महापालिकेत देखील ‘अकोट पॅटर्न’ शक्य होईल, हा विचार भाजपमध्ये नव्हे तर विरोधी पक्षात विशेषतः कॉंग्रेस आमदार पठाण आणि कॉंग्रेस नेत्यांमध्ये व्यक्त होऊ लागले. दोन दिवसांपूर्वी एक विचार आज एक विषय होऊन, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अजेंडा झाला आहे.

अकोल्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकरांच्या पुढाकाराने भाजपेतर पक्ष एकत्रीतपणे ‘ डिनर’साठी सिटी स्पोर्टस क्लबमध्ये उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर काल झालेल्या ‘डिनर डिप्लोमॅसी’ ला प्रकाश आंबेडकरांसह आमदार नितीन देशमुख, आमदार साजिद खान पठाण, दोन्ही राष्ट्रवादी, एमआयएम आणि अपक्ष नगरसेवक विशेषतः आशिष पवित्रकार यांची उपस्थितीने लक्ष वेधून घेणारी ठरली. या बैठकीनंतर महापालिकेतील सत्तेचं गणित अधिक स्पष्ट होत आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून आणि “आम्हाला कोणतंही पद नको,” असं काँग्रेसने स्पष्ट केले. अँड. आंबेडकर यांनीही सत्ता स्थापनेत अडचण नसल्याचे सुतोवाच केल्याने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची आघाडी आकाराला येण्याची शक्यता अधिक गडद होत आहे. अकोला महापालिकेत अँड.आंबेडकर यांच्या पक्षाने कधीकाळी महापौरपद विभुषित केले आहे. महापौर व उपमहापौर सोडून महत्त्वाचं असलेले स्थायी समिती सभापतीपद हे वंचित बहुजन आघाडी घेण्याची शक्यता आहे.महापौरपद ओबीसी महिला राखीव असल्याने भाजपविरोधी आघाडी साकार झाल्यास महापौर पदासाठी उद्धव ठाकरे किंवा इतर कोण ? हा मुद्दा आहेच.

एकूणच अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून विरोधकांची संयुक्त आघाडी बाजी मारणार, याचा फैसला आज होण्याची शक्यता अधिक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!