अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांची अकोला येथील धर्मादाय उपायुक्त कार्यालयात 6 में 2019 रोजी भरदुपारी झालेल्या हत्या प्रकरणात 15 जणांवर पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर झालेल्या सुनावणीचा निकाल जाहीर करताना मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी बी.कचरे यांनी 10 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावत सबळ पुराव्याअभावी 5 जणाची निर्दोष मुक्तता केली. निकाल जाहीर झाल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींना सिव्हिल लाईन पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले.

अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणाच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष केंद्रित होते. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी बी. कचरे यांच्या न्यायालयात 5 डिसेंबर 2025 रोजी कॉंउटर आरग्युमेंट होऊन, निकाल 21 जानेवारी 2026 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आज न्यायमूर्ती कचरे यांनी निर्णय जाहीर करताना सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्रीराम गावंडे, रणजीत गावंडे, विक्रम गावंडे, सूरज गावंडे, धीरज गावंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, प्रतीक तोंडे, मयूर अहीर, दिनेश राजपूत यांना गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

यासोबतच हुंडीवाले यांच्या हत्येत सहभागी असल्याचा कुठलाही ठोस पुरावे सरकार पक्षातर्फे सादर केला गेले नसल्याने प्रवीण (मुन्ना) श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दिपाली गावंडे, नम्रता गावंडे आणि शेख साबीर या पाचजणांची पुराव्याअभावी गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकारतर्फे नियुक्त विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम यावेळी उपस्थित होते.
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे स्व. किसनराव हुंडीवाले जवळचे नातेवाईक होते. या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सुरेंद्र व प्रविण हुंडीवाले आणि हुंडीवाले कुटुंबियांनी संपूर्ण समाधान व्यक्त केले.
अकोला जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या शासकीय बंगल्याच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांना 6 मे 2019 रोजी लाकडी फर्निचर आणि आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरने मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने किसनराव यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.शिक्षण संस्थेच्या मालकी वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात होतं. हुंडीवाले आणि सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्रीराम गावंडे यांच्या कुटुंबात हा वाद होता. हत्या प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये अकोल्यातील भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या पती व मुलांसह कुटुंबातील 5 जणांचा समावेश होता.
