अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला आहे. घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंगही उद्धवस्त करण्यात आली आहेत. हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. आता प्रश्न उपस्थित होतो की का ? का, की ‘संस्कृति रक्षण’ वगैरे सारखे मुळात कॉंग्रेसचा कधीच मुद्दा नाही. हा कॉंग्रेसचा प्रांत नाही. लोक हसतील म्हणून त्यांनी तिकडे जाऊ नये.

जगातील प्राचीन असं दुसऱ्या क्रमांकाचे गावं म्हणून काशीचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. अशा पौराणिक काशी अर्थात बनारस मधील मणिकर्णिका घाट, शेकडो लहानमोठे मंदिरांसह त्यावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवीची मूर्ती तोडल्या गेली आहे.हे चुकीचे की योग्य हा वेगळा विषय आहे. हा एक भावनिक विषय आहे. येथील मंदिर तोडल्या बद्दल विविध मते असू शकतात. पण मुळात हा मुद्दा धर्म भावनेशी जोडलेला आहे आणि अशा धार्मिक विषयांचे राजकारण करणे हा भाजपचा युएसपी आहे.
भावनांचे राजकारण थेट रस्त्यापर्यंत यशस्वीपणे नेणारी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी ज्या झुंडी पाळाव्या लागतात, तशा झुंडी नसल्याने कॉंग्रेसने तिकडे जाऊ नये. तशा झुंडी नसल्याने कॉंग्रेसने त्यांच्याशी संग न केलेलं बरं ! भाजपला टक्कर देण्यासाठी भाजप सारखेच राजकारण करणे ही बौद्धिक दिवाळखोरीच आहे.असं नम्रपणे नमूद करण्यामागे मोठा इतिहास आहे.
डाॅ.आंबेडकरांनी १९३७ नंतरच्या प्रांतिक निवडणुकांची साक्ष काढत काँग्रेसनं मुस्लीम लीग सोबत अनेक संधी असूनही कधीही आणि कुठेही संयुक्त सरकार बनवायला होकार दिला नाही, याचा उहापोह केला आहे. या राजकीय अस्पृश्यतेतून ‘भारतात आपल्याला कोणताही राजकीय अवकाश नाही’ ही भावना जिनांच्या मनात दृढ झाली आणि फाळणीची मागणी अधिक आग्रही झाली असंही बाबासाहेबांचं विश्लेषण आहे. (संदर्भ: थॉट्स ऑन पाकिस्तान)
काँग्रेस जेव्हा मुस्लीम लीग आणि हिंदू महासभा/जनसंघाला एकाच दूरीवर ठेवत होती तेव्हा मुस्लीम लीग-हिंदू महासभा ‘महायुती’ करून लढत होते. एकमेकांना पूरक राजकारण करत होते. काँग्रेस नेत्यांना या दोन्ही विषवल्ली नको होत्या. यांच्यासोबत जाणं म्हणजे देशात धर्माचं राजकारण आणणं आहे हे कॉंग्रेसच्या त्या नेत्यांना नीट कळत होतं.
मुस्लीम हवेत पण मुस्लीम लीग नको आणि हिंदू हवेत पण हिंदू महासभा नको यामागे एक दृढ विचार आहे. तेव्हाचा मतदारही या दोन्ही पक्षांना भीक न घालता काँग्रेसमागे प्रचंड ताकदीनं उभा होता. जिना जेवढ्या मुसलमानांचे नेते होते त्याच्या कैकपट जास्त मुसलमान गांधींचे अनुयायी होते. सावरकर जेवढ्या हिंदूंचे नेते होते त्यापेक्षा कैकपट जास्त हिंदू गांधींचे अनुयायी होते. काँग्रेसची ताकद कमी झाली म्हणून आज भाजपा आणि एमआयएमला अच्छे दिन आले आहेत. दोन्हीकडच्या धर्मांधांना खड्यासारखं वेचून राजकारणातून बाहेर काढायचं असेल तर काँग्रेस मजबूत होण्याला दुसरा पर्याय नाही.

आजही लोकं कॉंग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उघडपणे दिसून आले असून, कॉंग्रेसला मजबूत करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष म्हणून सपकाळ इमानेइतबारे मेहनत घेत आहेत,हे देखील लक्षात येते आहे. तेव्हा संस्कृतीचाच मुद्दा घ्यायचा तर महाराष्ट्रकारण घ्यावं.हे व्यापक अर्थाने
महाराष्ट्राच्या राजकारणाची हीच संस्कृती आहे.हाच कॉंग्रेसचा धर्म आहे. रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांनी जनता वैतागली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत.असंघटित कामगारांचे आहेत. बंद सरकारी शाळांचे आहेत. मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगारांचे आहेत. आदिवासीचे आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण झारखंड आणि छत्तीसगड खालोखाल देशात तिसऱ्या क्रमांकाचे आहे.उद्योजक आणि व्यावसायिकांचे प्रश्न आहे. शहरांचे शेकडो प्रश्न आहेत. पर्यावरणाचे आहेत. लाडक्या बहिणीच्या मोडतं चाललेल्या संसाराचे आहेत. महिला सुरक्षाचे आहेत. लोक विरोधी विकास नीतीचे आहेत. ह्या सगळ्या मुद्द्यांवर रस्त्यावर येऊन लढणारा पक्ष लोकांस हवा आहे. सुदैवाने आजही लोकांच्या दृष्टीने असा लढणारा एकमेव पक्ष कॉंग्रेस आहे.

१९२० नंतर कॉंग्रेस भारतभर रुजली कारण सामान्य शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न घेऊन लोक लाठ्या काठ्या खात होते. हे पुन्हा केले तर पक्ष पुन्हा वाढेल. भाजपचे राजकीय हिंदुत्व पूर्ण थोतांड आहे. तो त्यांचा कच्चा दूवा आहे. तो एक्सपोज़ करण्यासाठी खरे प्रश्न घेऊन लढणे आवश्यक आहे. ह्या सगळ्या प्रश्नावर काँग्रेसची ठोस भूमिका समोर येणं काळाची गरज आहे.गेल्या तीस चाळीस वर्षात कॉंग्रेसने रस्त्यावरच्या लढाया लढल्या नाहीत. परिस्थिती इतकी वाईट आहे की फक्त आपसात सत्तेचे मैनेजमेंट करणारे पक्ष आता लोकांना नको आहेत.
लोकांच्या अपेक्षा जास्त नाही. फक्त सुकरपणे जगता यावे, एवढीच अपेक्षा आहे. आज त्यांच्या जीवनावरील विपरीत परिणामासाठी कारणीभूत व्यवस्थेच्या विरोधात लढणारे पक्ष हवे आहेत. तुम्ही खरे प्रश्न घेऊन लढलात तर लोक साथ देतील.लोकही येईल सोबत लाठ्या खायला. संघटना सुद्धा उभी राहील पुन्हा. संघटना संघर्षातून बांधावी लागते आणि बांधली ही जाते.
कोणाच्या असण्यामुळे आणि नसण्यामुळे कोणाचे काहीही अडणार नाही, हे अंतिम सत्य आहे. राजकारण नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. हे चित्र पाहता आता या पुढे काय ?
पक्षाने मोठे केले याची जाणीव राखणारे आज बोटावर मोजता येतील इतकेच आहे.मात्र हेच मोजकेच पक्षाने दिलेली जबाबदारी कर्तव्य समजून पूर्ण करणारे आहेत. नैतिक व सार्वजनिक कर्तव्ये पूर्ण जबाबदारीने पार पाडण्यापेक्षा मंदिर/ धर्माच राजकारण करू लागलात तर कॉंग्रेस सुद्धा भाजपच्या मार्गाने जाईल. मग दोन्ही पक्षात अंतर राहणार नाही. हे कॉंग्रेसला परवडेल का ?
काळ कोणासाठी थांबत नसतो. तो पुढे जातच राहतो. मात्र त्या काळातील काही क्षण आपल्याला आतून हादरवतात. त्या क्षणी घेतलेला निर्णय आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो. इतरांना नाही, किमान स्वतःला न्याय देता आला, तरच जगणे अर्थपूर्ण ठरते.
