अकोला दिव्य न्यूज : श्री गणेश जयंतीच्या पवित्र निमित्ताने अकोल्यात सलग दुसऱ्या वर्षी भव्य-दिव्य भक्तिमय धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योती नगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता तब्बल ३ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहभागातून “एक लक्ष वेळा अथर्वशीर्ष पठण” करण्यात येणार आहे. मागील वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा अधिक व्यापक व नियोजनबद्ध स्वरूपात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गणेश जयंती, ज्याला माघ शुद्ध चतुर्थी असेही म्हणतात. गणेशाचा जन्मदिवस देखील मानला जातो. विघ्नहर्ता, बुद्धीदाता, मंगलमूर्ती गणपतीच्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकातील काही भागांत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी विशेष पूजा, आरती, भजन, हवन तसेच विविध धार्मिक विधी पार पडतात.
यंदा गणेश जयंतीच्या निमित्ताने होणारा हा उपक्रम धार्मिक तसेच सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरणार आहे. सामूहिक अथर्वशीर्ष पठणामुळे विद्यार्थ्यांना श्रद्धा, शिस्त, एकाग्रता आणि संस्कार रुजण्यास मदत होईल, असा आयोजकांचा विश्वास आहे. एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांच्या मुखातून होणारे अथर्वशीर्ष पठण संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन टाकणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन निलेश देव मित्र मंडळ अकोला, भारत शिक्षक प्रसारक मंडळ अकोला आणि श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर संस्था, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संस्था एकत्रितपणे कार्यरत असून, विविध समित्यांच्या माध्यमातून तयारी अंतिम टप्प्यात आहे.
या उपक्रमासाठी अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांचा विशेष पुढाकार आणि त्यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम दुसऱ्या वर्षी राबविण्यात येत आहे. हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार करणे, गणेश जयंतीचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि समाजात एकोप्याची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
गणेश जयंती उत्सवाबाबत अकोल्यातील भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या पवित्र उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आयोजन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी उपस्थिती व सहभागाने हा उपक्रम अधिक भव्य, दिव्य यशस्वी करावा, असं आवाहन आयोजकांनी केले आहे
