अकोला दिव्य न्यूज : नुकत्याच झालेल्या २९ महापालिकांतील महापौर पदासाठी २२ जानेवारीला आरक्षण सोडत काढली जाईल. नगरविकास विभागाने याबाबतची सूचना जारी केली. यानंतर महापौरपदासाठी राजकीय घडामोडींना वेग येईल. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षेतेखाली गुरूवार २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौर पदाची आरक्षण सोडत निघेल. ही सोडत निघाल्यानंतर संबंधित आयुक्त महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. सभागृह बैठकीची तारीख निश्चित केली जाईल. पहिल्या बैठकीत महापौर निवड होईल.

नव्याने गठीत केलेल्या जालना आणि इचलकरंजी महापालिका वगळता अकोला महापालिकासोबतच अन्य महापालिकांत कार्यकाळ संपण्याआधी शेवटचे महापौर पदाचे आरक्षण कधी लागू झाले आणि त्याची मुदत कधी संपली याची माहिती गोळा केली जात आहे.
महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाते. त्यामुळे याआधीचे संबंधित महापालिकेचे आरक्षण बाजूला काढले जाईल. आरक्षणासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे. आरक्षणाच्या प्रमाणाला २९ या संख्येने भागून महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण निश्चित होईल. यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असेल, अशी माहीती नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
