Monday, January 26, 2026
No menu items!
No menu items!
Homeमोठा धक्का ! मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू सहकारी आ.जोशी यांचा भाजपला रामराम

मोठा धक्का ! मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू सहकारी आ.जोशी यांचा भाजपला रामराम

अकोला दिव्य न्यूज : नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने नागपूरमध्ये १०० हून अधिक जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता. मात्र या विजयाचा आनंदोत्सव अजून संपलेला नसतानाच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांची माफी मागू मी हा निर्णय जाहीर करत आहे, असे जोशी यांनी या संदर्भात माहिती देताना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच आपल्या जागी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. 

अकोला दिव्य ग्राफिक्स

संदीप जोशी हे भाजपामध्ये नाराज असल्याची विशेषत: महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी विश्वासात न घेता तिकीट वाटप केल्याने, तसेच पक्षात नवीन आलेल्यांना संधी मिळत असल्याने संदीप जोशी हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र राजकीय निवृत्तीच्या घोषणेमागे नाराजी असल्याचे दावे संदीप जोशी यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच माझ्या मनात राजकीय निवृत्तीबाबतचा विचार गेल्या तीन चार महिन्यांपासून होता. मात्र त्यामागे एक टक्काही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात पक्ष आणि कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये संदीप जोशी यांनी लिहिले की, आता मला थांबायचंय ! हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवा आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा व वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा व वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे… आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे. 

मी आता ५५ वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे.
या पत्रात संदीप जोश पुढे लिहितात की, माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत, अर्थात आमदारकी, १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन. एखाद्या सामान्य, तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती द्यावी. १३ मे २०२६ नंतर मी संपूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय सखोल विचारांती घेतलेला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन.

राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतो. राजकारण हे माझ्या आयुष्यातील एक निमित्त होते. या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या निभावण्याची संधी मिळाली. हे कार्य मात्र पुढेही अविरत सुरू राहील, असेही जोशी यांनी सांगितले. 

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून जोशी यांची २०२२ मध्ये निवड झाली होती त्यांची मुदत २०२४ मध्ये संपली आहे आणि आता त्यांची २०२४ मध्ये पुन्हा निवड झाली आहे.त्याची मुदत २०३० मध्ये संपणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!