अकोला दिव्य न्यूज : नुकत्याच संपन्न झालेल्या महापालिका निवडणुकीत महिलांसाठी राखीव ‘अ’ आणि ‘क’ या दोन प्रवर्गात या पैकी कोणीही नाही अर्थात ‘नोटा’ पर्यायाला तब्बल 13 हजार 271 मतें मिळाली आहे. एकुण 20 प्रभागात झालेल्या मतदानात नोटाला जवळपास 25 हजार मतें मिळाली आहे. या मतांचे विश्लेषण केले असता ‘अ’ मध्ये 6 हजार 240 आणि ‘ब’ मध्ये 7 हजार 31 मतें मिळाली. प्रभाग क्रमांक 11 मधील ‘क‘ प्रवर्गात सर्वात जास्त म्हणजे 1 हजार 487 तर प्रभाग क्रमांक 1 मधील ‘क‘ वर्गात सर्वात कमी म्हणजे 110 मतें नोटाला मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे सुशिक्षित मतदारांचे नगण्य प्रमाण असलेल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये नोटाला फक्त 854 मतें आहेत.

अकोला शहरातील 20 पैकी 20 प्रभागात कमी जास्त प्रमाणात नोटाला मते मिळाली आहे. मात्र ‘नोटा’ला सर्वाधिक पसंती सुशिक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शास्त्रीनगर भागात मिळाली आहे, तर सगळ्यात कमी नोटाचे मतदान नायगाव,अकोट फैल, अशोक नगर यासारख्या मागास समजल्या जाणाऱ्या भागात झाले.
अकोल्यातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रामुख्याने माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या पत्नी व भाजपचे उमेदवार सुनिता अग्रवाल, भाजप निलंबीत नगरसेवक आशिष पवित्रकार, भाजपचे नगरसेवक अनिल मुरूमकर, भाजपचे विशाल इंगळे व प्राची काकड लढतीत होते. यात बंडखोर पवित्रकार यांचा विजय झाला. विशाल इंगळे पराभूत झाले आणि भाजपचे तीन उमेदवार निवडून आले. मात्र, अ, ब, आणि क असं तीन प्रवर्गातून ‘नोटा’ म्हणजे ‘वरील उमेदवारांपैकी कुणालाही नाही’ या पर्यायाला तब्बल 1601 मतदारांनी निवडलं. तर ‘ड’ मध्ये केवळ 103 मतं नोटाला मिळाले आहे.
नायगाव, अशोक नगर, तारफैल या परिसराचा प्रभाग क्रमांक 1 मध्ये समावेश आहे. मुस्लिम समाजाचे प्रमाण सर्वात जास्त असून तब्बल 26 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यातही मुस्लिम उमेदवारांची संख्या देखील जास्त मात्र चारही प्रवर्गातून नोटा पर्यायाला केवळ 854 मत मिळाले आहे.
विशेष म्हणजे या प्रभागातून चार ही उमेदवार कॉंग्रेस पक्षाचे विजयी झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेस व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, एमआयएम, भाजप, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार परस्परांच्या विरोधात लढले आणि कॉंग्रेस पक्षाने विजय मिळविला. सुशिक्षित मतदारांचे प्रमाण कमी असताना ‘नोटा’ला सगळ्यात कमी पसंती मिळाली. विशेष म्हणजे या प्रभागात महिला राखीव प्रवर्गातील ‘अ’ आणि ‘क’ मध्ये 569 तर ‘ब’ आणि ‘ड’ खुल्या प्रवर्गात केवळ 272 मतं नोटाला मिळाले आहे.
