अकोला दिव्य न्यूज : शिवसेनेचे राष्ट्रीय प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बुधवार ७ जानेवारी रोजी अकोल्यातील जुने शहरात दुपारी १ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेनंतर अकोल्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अकोला महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटकपक्ष असलेली शिवसेना स्वबळावर लढत असून सेनेने पहिल्यांदाच तब्बल ७२ उमेदवार रिंगणात उतरवून राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या भाजपला आव्हान दिले आहे. विदर्भ समन्वयक व राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्त्वात माजी आमदार श्रीकांत देशपांडे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली उपनेते गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर,अश्विन नवले,नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे गुरुजी,युवासेना प्रदेश सचिव विठ्ठल सरप, शहरप्रमुख राजेश मिश्रा,रमेश गायकवाड, वैभव चौधरी, जिल्हाउपप्रमुख योगेश अग्रवाल,महिला आघाडी जिल्हाप्रमुख उषाताई विरक,रेखाताई राऊत यांनी निवडणूक सभेची तयारी जवळपास पुर्ण केली आहे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या जाहीरसभेने प्रचार चरमशिगेवर पोहचणार आहे.

शिवसेनेचे यावेळी ४० पेक्षा जास्त प्रभावी उमेदवार रिंगणात उतरले असून त्यांना प्रचाराची मोठी रसद पुरविण्यात येत असल्याने अकोला शहरात शिवसेनेचा मोठा झंझावात येत्या दिवसात तयार होण्याचे चिन्ह दिसत आहे. आज होणाऱ्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत अकोला शहरातील विविध पक्षातील अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती स्थानिक नेत्यांनी दिली.
आज वचननामा प्रकाशन : आज बुधवार दुपारी १ वाजता डॉ. आंबेडकर मैदानावर होणाऱ्या सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेकडून अकोला मनपा निवडणूक संदर्भात तयार केलेल्या वचननामाचे प्रकाशन होणार आहे. युवासेना सचिव विठ्ठल सरप पाटील आणि उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल यांच्या सहभागाने हा वचननामा तयार करण्यात आला आहे.
