Thursday, February 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातून मोठी बातमी ! हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू : एकाला घेतलं...

अकोल्यातून मोठी बातमी ! हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू : एकाला घेतलं ताब्यात

अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि सहकार नेते, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच अकोला लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढलेले ज्येष्ठ व वजनदार नेते हिदायत पटेल यांचे आज बुधवार ७ डिसेंबरला सकाळी उपचार सुरू असताना, निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.घटनेनतंर पोलिसांनी संशयित म्हणून एकाला ताब्यात घेतले आहे .त्यांच्या हत्येत सहभागी सर्व मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. हा हल्ला कोणी आणि का केला, याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अकोट नगरपालिकेच्या काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवार अलका बोडके यांनी हिदायत पटेल यांच्यावर पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचा जाहीर आरोप केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर, हा हल्ला राजकीय वादातूनच झाला असावा, असा कयास पोलिसांनी वर्तवला आहे.

हिदायत पटेल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचा एक आक्रमक आणि महत्त्वाचा चेहरा म्हणून हिदायत पटेल यांची ओळख आहे.

अकोट तालुक्यातील मोहाळा या त्यांच्या मुळ गावात पटेल यांच्यावर काल मंगळवारी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी होते. त्यांच्यावर अकोट येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर उपचारार्थ अकोला शहरात आणले होते. मात्र आज पहाटे ओझोन हॉस्पिटल अकोला येथे उपचारादरम्यान हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्याची माहिती मुलगा फतेह पटेल यांनी दिली.

काल हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत हिदायत पटेल यांना प्रथम अकोटमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोल्यातील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र यानंतर आज पहाटे त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. हिदायत पटेल यांच्या मृत्यूची माहिती मिळताच अकोला व अकोटमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. परिस्थिती चिघळू नये, यासाठी अकोला शहरासह मोहाळा गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज अकोला शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा असल्याने हा बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!