जागरूक वापरच सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण – सुदर्शन पाटील अकोला दिव्य न्यूज : डिजिटल युगाशी पाऊलताल ठेवत अकोला अर्बन बँकेच्या इंटरनेट बँकिंग सेवेचा शुभारंभ आज उत्साहात करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शंतनू जोशी होते. उद्घाटक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील तसेच विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स अकोला चे अध्यक्ष निकेश गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचावर बँकेचे उपाध्यक्ष राहुल राठी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी बँकेच्या विविध आर्थिक सेवा, आधुनिक बँकिंग प्रॉडक्ट्स आणि ग्राहकाभिमुख उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ग्राहकांना अधिक सुलभ, सुरक्षित व वेगवान सेवा देण्याच्या दृष्टीने इंटरनेट बँकिंग हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्घाटक सुदर्शन पाटील यांनी इंटरनेट बँकिंगच्या शुभेच्छा देताना डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, डिजिटल अरेस्ट तसेच सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांवर प्रकाश टाकला. सुरक्षित आणि जागरूक वापरच सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण देऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील अनेक गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंटरनेट बँकिंगच्या शुभारंभामुळे अकोला अर्बन बँक ग्राहकसेवेत नव्या डिजिटल पर्वात प्रवेश करत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
श्री राज राजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीचे लोकार्पण
अकोला अर्बन बँकेतर्फे थ्री डी प्रिंटिंगच्या माध्यमातून अकोला शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आत्मा असलेल्या श्री राज राजेश्वर मंदिराच्या हुबेहूब दिसणाऱ्या प्रतिकृतीचे लोकार्पण भक्तिभावात पार पडले. अकोल्याचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या या प्राचीन व श्रद्धास्थानाच्या प्रतिकृतीमुळे भाविकांना मंदिराच्या दिव्यतेचा अनुभव अधिक जवळून घेता येणार आहे.या प्रतिकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे मूळ मंदिराची स्थापत्यशैली, रचना, शिल्पकला व पावित्र्य जपून केलेली अचूक मांडणी. मंदिराच्या प्रत्येक सूक्ष्म तपशीलाला जपून घडविण्यात आल्याने ही प्रतिकृती पाहताच भाविकांच्या मनात श्रद्धा आणि अभिमानाची भावना दाटून आली. प्रथम प्रतिकृती श्री राज राजेश्वर संस्थानचे अध्यक्ष अँड गिरीश देशपांडे, सचिव गजानन घोंगे यांना प्रदान करण्यात आली.
