अकोला दिव्य न्यूज : विधानसभा निवडणुकीमध्ये बंडाचा झेंडा खांद्यावर घेऊन वंचित आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढणारे माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये घरवापसी केली आहे. भाजपने त्यांचे निलंबन रद्द केले. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात पुनर्प्रवेश केला. यामध्ये महसूल मंत्री तथा राज्याचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास काही तास राहिले असतांनाच मोठ्या राजकीय घडामोडीला वेग आला आहे. भाजपने हरीश आलिमचंदानी यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आलिमचंदानी इच्छूक होते. मात्र, पक्षाने माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या हरीश आलिमचंदानी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली.
उमेदवार माघारीनंतर वंचित आघाडीने देखील हरीश आलिमचंदानी यांना पाठिंबा दिला. तब्बल २९ वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या भाजपला अकोला पश्चिममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी भाजपच्या विजय अग्रवालांचा अवघ्या एक हजार २८३ मतांनी पराभव केला. हरीश आलिमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, राजेश मिश्रा यांच्या बंडखोरीचा पक्षाला मोठा फटका बसला होता. या निवडणुकीत वंचित समर्थित अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना २० हजार ५१७ मते मिळाली होती. हरीश आलिमचंदानी यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढल्यानंतरही आपली हिंदुत्ववादी भूमिका सोडली नाही.

भाजपमध्ये परतीसाठी हरीश आलिमचंदानी यांचे प्रयत्न सुरू केले. मात्र, पराभवाची सल मनात कायम असल्याने स्थानिक नेतृत्वाचा त्यांच्या घरवापसीला विरोध होता. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराज गटाची मोट बांधण्याचा प्रयत्न हरीश आलिमचंदानी यांनी केला. नाराज गटाने घेतलेल्या पहिल्याच संवाद सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. या संभाव्य तिसऱ्या आघाडीमुळे फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चेसाठी हरीश आलिमचंदानी यांना नागपूरला बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा करून घरवापसी करण्याचे सूचित केले.
स्थानिक नेतृत्वाशी देखील चर्चा करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी समजूत काढली. त्यानंतर आज हरीश आलिमचंदानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष आदेशाचे पालन करू, असा शब्द हरीश आलिमचंदानी यांनी पक्ष नेतृत्वाला दिला आहे.
