Friday, December 26, 2025
No menu items!
No menu items!
Homeसात वर्षांची सेवायात्रा !थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी संकलित निधी समर्पित

सात वर्षांची सेवायात्रा !थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी संकलित निधी समर्पित

अकोला दिव्य न्यूज : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मागील सात वर्षांपासून थॅलेसिमियाग्रस्त बालकांच्या उपचारासाठी राबविण्यात येणाऱ्या रद्दी संकलन उपक्रमातून जमा झालेला निधी आज छोटेखानी कार्यक्रमात समर्पित करण्यात आला.

या वर्षीच्या उपक्रमातून संकलित करण्यात आलेला निधी पाच थॅलेसिमियाग्रस्त बालकांच्या संपूर्ण वर्षभराच्या वैद्यकीय उपचार व रक्तसंक्रमणासाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढीस समर्पित करण्यात आला. समाजातील नागरिकांनी दिलेल्या रद्दीच्या स्वरूपातील योगदानातून अशा संवेदनशील उपक्रमाला बळ मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय देशपांडे होते. प्रमुख पाहुणे भास्करराव किटुकले, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे निलेश जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिलीपराव देशपांडे यांनी केले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत निलेश देव व डॉ. स्नेहा गोखले, सौ.रश्मी देव यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी थॅलेसिमिया या आजाराबाबत माहिती देताना सांगितले की, या आजाराने ग्रस्त मुलांना दर पंधरा ते वीस दिवसांनी रक्तसंक्रमणाची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत समाजातील व्यक्ती, संस्था व दाते यांचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरते. अँड धनश्री देव स्मृती सेवा या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मागील सात वर्षांपासून या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक थॅलेसिमियाग्रस्त बालकांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले असून, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव व मानवतेचे दर्शन या उपक्रमातून घडत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जयंतराव सरदेशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. अल्प स्वरूपात पार पडलेल्या या कार्यक्रमातून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!