अकोला दिव्य न्यूज : अकोला व पंचक्रोशीतील साहित्य प्रेमींना साहित्याची मेजवानी देण्यासाठी एक दिवसीय लेखिका संमेलनाची जय्यत तयारी सुरु असून, वाशीम रोड येथे उद्या गुरुवार 25 डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कूल परिसरात राज्यातील नामवंत लेखिकांची मांदियाळी जमणार आहे. लेखिका संमेलनाला ‘स्व.प्रा. भाऊसाहेब मांडवगणे साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले असून प्रस्तुत संमेलन हे ‘स्व. सीमाताई शेटे-रोठे स्मृति समर्पित’ असणार आहे.

विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला तर्फे आयोजित एक दिवसीय लेखिका संमेलन सुप्रसिध्द कादंबरीकार प्रा.डॉ. भारती सुदामे यांच्या अध्यक्षतेत होत असून, उद्घाटक म्हणून अभिनेत्री आणि लेखिका डॉ. सौ. श्वेता पेंडसे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका नीलिमा विलास पाटील असणार आहेत. ग्रंथदिंडी, नावीन्यपूर्ण उद्घाटन सोहळा, अभिनेत्री आणि लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांची प्रकट मुलाखत, ‘माझा डेबू संत झाला रे…’ ही कार्तिकी मनोज सोनोने हिची नाट्यछटा, परिसंवाद, निमंत्रितांचे कवयित्री संमेलन, कवयित्री कट्टा, ग्रंथदालन, आकर्षक सेल्फी पॉईंट अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

यावेळी विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, अ.भा. मराठी साहित्य महामंडळ, पुणेचे सदस्य डॉ. दादा गोरे, लेखिका व उपसंचालक, शिक्षण विभाग, पुणे च्या डॉ. सुचिता पाटेकर, विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाचे अध्यक्ष विजय कौसल, लेखिका संमेलनाचे मुख्य कार्यवाह तथा अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे उपस्थित राहणार आहेत.

अभिनेत्री आणि लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांची प्रकट मुलाखत सौ. मोहिनी मोडक व डॉ.सौ. समृध्दी तिडके ह्या घेणार आहेत. ‘बदलत्या काळातील लेखिकांची भूमिका’ या विषयावर डॉ. दादा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद असून सुप्रसिध्द कवयित्री प्रा. मीनल येवले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल.
या लेखिका संमेलनाचे विशेष म्हणजे लेखिका व सायबरतज्ज्ञ मोहिनी मोडक यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी ‘ब्लॉग लेखन कार्यशाळा’ तर नव्याने लिखाण करणार्यांसाठी ‘काव्यलेखन कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून लेखिका व अनुवादक प्रा.डॉ. स्वाती दामोदरे मार्गदर्शन करणार आहेत.
लेखिका वर्गाला प्रकाशझोतात आणण्याचे कार्य करणार्या प्रकाशकांचा आणि महिला पत्रकारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्या सौ. प्रतिभाताई जानोळकर व यशस्वी उद्योजिका प्रभा नितीन खंडेलवाल यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
लेखिका संमेलनाचा समारोप समारंभ हा संमेलनाध्यक्ष डॉ. भारती सुदामे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या समारंभात ज्येष्ठ लेखिकांचा सत्कार होणार असून त्यामध्ये पद्माताई मांडवगणे, मीराताई ठाकरे, शीलाताई गहलोत, देवकामाई देशमुख, डॉ. विमल भालेराव, डॉ. लीना आगाशे, वीणा मालशे, प्रेमा शुक्ल आणि प्रा.डॉ. अनघा सोनखासकर यांचा समावेश आहे. या संमेलनास सुजाण साहित्य रसिकांनी उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष विजय कौसल, मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे आणि संमेलन सरचिटणीस मोहिनी मोडक व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
