अकोला दिव्य न्यूज : इन्स्टिट्युट ऑफ सोशल वेल्फेअर, अकोला द्वारा संचालित महात्मा फुले आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रथम बी.ए.एम.एस. बॅचचा प्रवेश सोहळा आज रविवार २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. बाभुळगाव येथील महात्मा फुले आयुर्वेद महाविद्यालय सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ मेडिकल अॅण्ड रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष गोयनका, प्रमुख वक्ते सचिन बुरघाटे, अकोला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, माजी आमदार वसंतराव खोटरे, वैद्यकीय अधिक्षीका डॉ. राधा जोगी, डॉ. दिपक केळकर आणि सेंट्रल कॉन्सिल ऑफ इंडीयन मेडिसीन नवी दिल्लीचे माजी सदस्य प्रा. डॉ.के.सी. त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महात्मा फुले आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. सुधीर ढोणे, संचालिका डॉ. श्रद्धा ढोणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर ढोणे यांनी केले आहे.
केंद्र सरकार,राज्य सरकार व आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता
अकोल्याच्या शैक्षणिक इतिहासात आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर अकोला संचालित महात्मा फुले आयुर्वेद महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून बीएएमएस अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता प्रदान केली आहे.
भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह मान्यता दिली आहे
सुसज्ज इमारत, आधुनिक रूग्णालय व तज्ज्ञांचे मार्गदर्शन
बाभुळगाव येथे उभारलेली महात्मा फुले आयुर्वेदिक संकुलची सुविधा आधुनिक आयुर्वेदाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सुसज्ज इमारत, १०० खाटांचे आधुनिक रुग्णालय, पंचकर्म विभाग, अत्याधुनिक उपकरणे, नियमित ओपीडी, तसेच अनुभवी विशेषज्ञ डॉक्टर व प्राध्यापकांची टीम, विद्यार्थी प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व घटक येथे उपलब्ध आहेत.
पहिल्याच वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपचारापासून संशोधनापर्यंत अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
संस्थापक अध्यक्ष डाॅ.सुधीर ढाेणे यांच्या कुशल नेतृत्व व दूरदर्शी मार्गदर्शनाखाली महात्मा फुले शैक्षणिक परिवाराने आजवर दर्जेदार शिक्षण दिले आहे. विविध संस्थांनंतर आता या संस्थेच्या बीएएमएस महाविद्यालयाची भर पडल्याने अकाेल्यातील वैद्यकीय शैक्षणिक वारसा अधिक समृद्ध झाला आहे.
विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण, तंत्रज्ञान, प्रात्यक्षिक अनुभव
विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद शिक्षणासाठी आणखी एक संधी खुली झाली आहे. त्यामुळे या भागातील वैद्यकीय शिक्षणाला नवे बळ मिळणार आहे. विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी ही केवळ प्रवेश सूचना नाही—ही भविष्याची नवी दारं उघडणारी संधी आहे. वाढत्या आयुष उपचार पद्धतींच्या मागणीत स्थानिक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण, तंत्रज्ञान, प्रॅक्टिकल अनुभव आणि करिअर मार्ग मिळणार आहे.
