अकोला दिव्य न्यूज : राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीची घोषणा करताच अकोल्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते मैदानात उतरले. शहरातील एका लॉनमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत अकोल्याच्या विकासाबाबत जनभावना जाणून घेण्यात आल्या. या संवादातून एक स्पष्ट संकेत पुढे आला की मनपा निवडणुकीत प्रस्थापितांना शह देण्यासाठी नवीन आघाडी उभी राहण्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, राज्यभरात पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची घरवापसी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अकोल्यात हा घरवापसीचा पॅटर्न अद्याप दिसत नाही आणि काल झालेल्या थेट संवादाने नवीन आघाडी महायुतीसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या नव्या राजकीय समीकरणांना जन्म देणार की काय होईल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपाचा बालेकिल्ला मानला जाणारा पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघ हातातून निसटलेला असताना, मनपा निवडणुकीतही भाजपसमोर मोठे आव्हान उभे टाकण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचे चिन्ह दिसत आहेत. या नव्या आघाडीत भाजपातीलच अनेक स्वाभिमानी पदाधिकारी व कार्यकर्ते सामील होण्याची शक्यता वर्तवली जात असून, तसे घडल्यास त्याचा थेट फटका उमेदवारांच्या मतपेटीवर बसणार, असे मत व्यक्त केले जात आहे.काही दिवसात सगळ चित्र स्पष्ट होईलच.
या नागरिक संवादाच्या वेळी मंचावर हरीशभाई अलीमचंदानी, गिरीश गोखले, आशिष पवित्रकार, डॉ. अशोक ओळंबे, हरिभाऊ काळे, चोटमल सारडा, पांडुरंग काळणे, विठ्ठलराव गाढे, मधुकर रगडे आणि प्रा. गणेश बोरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शहरातील सर्वच परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
एकूणच, अकोल्याच्या राजकारणात नव्या आघाडीचा उदय हे मनपा निवडणुकीत अवघड जागेवरच दुखणं तर होणार तर नाही ना! हे बघणं रंजक होईल.
