अकोला दिव्य न्यूज : बिर्ला कॉलनी स्थित सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन गोदावरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सिंह राजपूत यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या मनीषा राजपूत उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक संस्था व अध्यापक सर्वजण धडपडत असतात परंतु यामध्ये सुसंवाद साधता यावा म्हणून पालक अध्यापक व संस्था एकत्र येण्याच्या उद्देशाने पालकांसाठी सुद्धा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला जातो.

याप्रसंगी बुक बॅलन्सिंग, डिस्पोजेबल ग्लासेसचे मनोरे बनवणे, एक मिनिट स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले होते .त्यामध्ये दुपार विभागातून वडिलांच्या स्पर्धेमध्ये विठ्ठल जाधव यांचा प्रथम क्रमांक तर आई पालकांमधून शितल दामोदर यांचा प्रथम क्रमांक आला. यावेळी जोडप्यांसाठी आयोजित स्पर्धेत हर्षल देशमुख हे जोडपे विजय झाले आहे.
जिंकलेल्या स्पर्धकांचा पुष्पगुच्छ देऊन राजपूत व सौ राजपूत यांनी यथोचित सत्कार केला. या स्पर्धकांचा शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या जीवनाच्या व्यस्ततेतून वेळ काढून कधीतरी जीवनात खेळाचा आनंद लुटावा ज्यामुळे आपला दिवस उत्साही व आनंदी जातो आणि आपल्याला ऊर्जा मिळते असा संदेश सौ मनीषा राजपूत यांनी दिला.तर संसार चक्रामधून बाहेर येऊन आपला कुठलातरी एखादा आवडीचा खेळ आपण जोपासला पाहिजे. ज्यामुळे शारीरिक दृष्ट्या आपल्याला सुदृढ व ऊर्जावान राहता येईल असा संदेश राजपूत यांनी दिला. जेणेकरून मुलं सुद्धा आपला कित्ता गिरवू शकतात व त्यांच्यामध्ये सुद्धा खेळाबद्दल आवड निर्माण होईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन पंकज गाढे, दुर्गा टीचर, सौ यादव व खर्चे मॅडम यांनी केले होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन चित्रा देशपांडे व सुषमा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता खानझोडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. पालक आपल्या चेहऱ्यावर बालपणीच्या आठवणी, खेळाचा आनंद व हास्य घेऊन आपल्या व्यस्त दिनचर्येकडे पुन्हा परतले.
