Saturday, December 13, 2025
No menu items!
No menu items!
Homeअकोला जिल्ह्यात बालमृत्यूचे वाढते प्रमाण ! सरकारची कबूली

अकोला जिल्ह्यात बालमृत्यूचे वाढते प्रमाण ! सरकारची कबूली

अकोला दिव्य न्यूज : राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत तब्बल १४,५२६ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही आकडेवारी त्यांनी सादर केली.

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी लेखी उत्तरात नमूद केले की, २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये एकूण १४,५२६ मुलांचा मृत्यू झाला. यामध्ये नवजात शिशूपासून ते पाच वर्षांखालील मुलांचा समावेश असून, सर्वच मुलांना सरकारी आरोग्य केंद्रांत उपचारासाठी दाखल केले होते. कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूंचाही यात समावेश आहे. याशिवाय आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात १३८ नवजातांचा मृत्यू  झाला.

आबिटकर यांनी २०२२ मधील रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम अहवालाचाही उल्लेख केला. त्यानुसार महाराष्ट्रातील नवजात शिशू मृत्युदर हा प्रति १ हजार जन्मांमागे ११ असून, राष्ट्रीय सरासरी २३ पेक्षा लक्षणीय कमी आहे. नियमित आरोग्य तपासणी, गर्भवतींसाठी अमृत आहार योजना, सॅम श्रेणीतील मुलांसाठी लक्ष्यित हस्तक्षेप, पोषण अभियान, मातृ वंदना योजना तसेच सुपोषित महाराष्ट्र उपक्रम या योजनांद्वारे कुपोषण कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी टास्क टीम

विधान परिषदेत आ. उमा खापरे यांनी बालमृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले, एकाही बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये, यासाठी शासन प्रयत्नशील असून, त्यासाठी विशेष कृती पथक तयार करण्यात येईल. विदर्भातील समस्या दूर व्हाव्यात यासाठी नागपुरात हिवाळी अधिवेशन घेण्यात येते. मात्र, कुपोषण  व बालमृत्यूसारख्या गंभीर मुद्द्यांवर केवळ अर्धा तास चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!