अकोला दिव्य न्यूज : संस्कृतीचा वारसा जपत आंतरराष्ट्रीय आजी–आजोबा दिन बिर्ला कॉलनी येथील सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या द्वारावर आकर्षक रांगोळी आणि तिलकपूजनाने आजी–आजोबांचे पारंपरिक स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी दुर्गा राऊत, चित्रा देशपांडे, उपशाम, श्रावणी मोहोड तसेच सुषमा देशमुख उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत, तर प्रमुख पाहुणे म्हणून समुद्रे साहेब आणि माकोडे ताई उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून गोदावरी बहुउद्देशीय संस्थेच्या वयोवृद्ध आणि अनुभव संपन्न गोदावरीताई राजपूत, केशवराव वतपाळ दाम्पत्य आणि सुलोचनाताई तोमर यांची उपस्थिती लाभली होती.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी “दादा-दादी, नाना-नानी वेलकम टू अवर स्कूल” हे स्वागतपर नृत्य सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. विद्यार्थिनी जीविका शिरसाट, आदिती पारधी, गुंजन मंजूरकर, आराध्या बहुराशी, विज्ञाप्ती शिरसाट व साची इंगोले यांनी या नृत्यामध्ये सहभाग घेतला.

इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नाटकाने आजी–आजोबांच्या अल्बममधील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. प्राविण्या शेगोकार, अंजली चराटे, गौरी सोनटक्के, मृणाली लोखंडे, दर्शना बेलसरे, धनश्री नेमाडे आणि लक्षिता किल्लेदार यांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला.
गुंजन मंजूरकर हिने आजोबांचे जीवनातील महत्त्व स्पष्ट करणारे भाषण केले, तर कुमारी समुद्रे हिने आजी–आजोबांवर भावस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांना भावूक केले.
आजी–आजोबांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. वैयक्तिक खेळात आजीमधून चंद्रकला शिरसाट, तर आजोबामधून विष्णू माकोडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जोडपे खेळात अशोक काजरे व पुष्पा काजरे यांना प्रथम क्रमांक मिळाला. विजेत्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष राजपूत आणि प्राचार्या मनिषा राजपूत यांनी केले.
प्रमुख पाहुणे समुद्रे यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल विद्यालयाचे आभार मानले. “वय वाढले तरी नियमबद्ध दिनचर्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रसन्न व आनंदी राहता येते,” असे त्यांनी सांगितले. अध्यक्ष राजपूत व प्राचार्या मनिषा राजपूत यांनी आजी–आजोबांचे घरातील महत्व, संस्कार जपण्यातील भूमिका आणि आधुनिक छोट्या कुटुंबांमध्ये त्यांच्या स्थानाविषयी मार्गदर्शन केले.
अर्पिता करवते, निधी जाधव, त्रिवेणी तायडे आणि समीक्षा बहुराशी यांनी सुबक व आकर्षक संचालन करून कार्यक्रमात ऊर्जा भरली.
या कार्यक्रमाचे प्रभारी पंकज गाढे, दुर्गा राऊत, चित्रा देशपांडे आणि सुषमा देशमुख यांनी मेहनत घेतली. शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी खानझोडे यांनी आपल्या कवितेतून आजी–आजोबांचे महत्व अधोरेखित केले. स्नेहमिलनाचा समारोप होताच आजी–आजोबा आनंदाश्रूंसह, नव्या उमेदीनं व उत्साहानं घरी परतले.
